Dainik Maval News : राज्यात सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे देखील आरक्षण जाहीर झाले असून तिथेही इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. परंतु या निवडणुकांबाबत पन्नास टक्के आरक्षणाचा मुद्दा कोर्टात असल्याने ह्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याच्या चर्चा रंगत आहेत. यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार धास्तावले असून राजकीय गणित बिघडू शकते अशी भीती त्यांना सतावत आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत. 29 महागनरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांचा गाडा प्रशासक हाकत आहेत. सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे पार पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.
सुप्रीम कोर्टात झालेल्या आजच्या सुनावणीत एका बाजूने ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण कायम ठेवण्याची मागणी केली गेली. तर दुसऱ्या बाजूने 50 टक्के मर्यादा पाळण्याचा आग्रह धरला. आरक्षणाचा कोटा ओलांडला असल्यास त्याची संपूर्ण यादी सादर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले. तर, दुसरीकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगर पालिका निवडणुकांचा कार्यक्रम सध्या जाहीर होणार नाही अशी माहिती आयोगाने कोर्टात दिली. मात्र, आधीच जाहीर झालेल्या निवडणुकांना स्थगिती नसून त्याबाबतचा अंतिम निर्णय पुढील सुनावणीत ठरणार आहे. पुढील सुनावणी 28 तारखेला होणार आहे.
इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली :
मावळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये काही उमेदवारांबाबत निवडीची घोषणा केली असली तरीही अनेक गटात आणि गणांमध्ये अजूनही उमेदवारीवर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. नेतेमंडळींच्या भरवश्यावर अनेक इच्छुकांनी आपला प्रचार सुरु ठेवला आहे. परंतु आतापर्यंत झालेल्या खर्चामुळे बदलत्या समीकरणांमुळे त्यांची झोप उडाली आहे. त्यात निवडणुकीचे भविष्य कोर्टाच्या निकालावर अवलंबून असल्याने इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade

