Dainik Maval News : मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) प्रमुख पवना धरण ( Pawana Dam ) आजमितीस (दि. 7 जुलै) 77.28 टक्के इतके भरले आहे. सध्या पवन मावळ परिसरात पावसाची जोरदार बॅटींग ( Rain Updates ) सुरू आहे. सोमवारी सकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार धरण क्षेत्रात चोवीस तासात तब्बल 63 मि.मी. इतका पाऊस नोंदविण्यात आला असून यंदाच्या हंगामातील एकूण पाऊस 1190 मि.मी. इतका आहे. यासह धरणात पाण्याचा येवा सुरूच असून पाणी नियंत्रणासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
सध्या पवना धरणातून 2600 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाचा जोर वाढल्यास आणि धरणातील पाण्याचा येवा वाढल्यास हा विसर्ग आणखीन वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षीची आकडेवारी पाहिल्यास गतवर्षी जुलै 7 तारखेला धरणात अवघा 20.99 टक्के इतका पाणीसाठा होता, याचा अर्थ यंदा 57 टक्के पाणीसाठा अधिक आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा –
पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की, पवना धरण सद्यस्थितीमध्ये 77.28 टक्के भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने 2600 क्युसेक्स मुक्त विसर्ग करण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे., अशी माहिती पवना धरण पूरनियंत्रण कक्ष, खडकवासला पाटबंधारे विभाग यांनी दिली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– इंद्रायणी-पवना नद्यांचे उगमापासून ते संगमापर्यंत शुद्धीकरण करण्यात येणार ; नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू
– पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 32 गावांना विकासात्मक न्याय देणार ; राज्य सरकारचे आश्वासन
– विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन । Pune News