Dainik Maval News : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत मागील सात महिन्यांपासून फरार असलेल्या एका हाय प्रोफाइल आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे यांनी दिली.
आकाश अजिनाथ साळुंखे (वय 28, रा. हडपसर पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भावेश पटेल (रा. नवी मुंबई) यांनी जानेवारी महिन्यात या फसवणूक प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी भावेश पटेल यांच्या फिर्यावरून दिलेल्या माहितीनुसार, भावेश पटेल यांचे वाकसई गावच्या हद्दीत वरसोली टोल नाका येथे सिल्वर स्टोन कन्स्ट्रक्शन कंपनी नावाने 52 बंगल्याची स्कीम बनवली होती. कामात नुकसान झाल्याने ते गुंतवणूकदार शोधत होते. तेव्हा त्यांची ओळख आकाश साळुंखे याच्यासोबत झाली.
एटीएस अधिकारी त्याचा भाऊ असल्याचे भासवत त्याने पटेल यांचा विश्वास संपादित करत त्यांना 42 कोटी रुपये देण्याचे मान्य करत कंपनीचे 80 टक्के शेअर नावावर करुन घेतले. त्या बदल्यात 42 कोटी रुपये रक्कमेचे 8 धनादेश त्याने पटले यांना दिले.
मात्र, दस्तऐवज नोंद होताच त्याने धनादेशचे पेमेंट थांबवले. सदरचे नोंदणी झालेले दस्त हे पटेल यांच्या कार्यालयात होते तेथून ते दस्त आकाश याने न कळत लंपास केले व त्या आधारे सदर बंगले व मालमत्ता याची स्वतःच्या नावावर नोंद करण्यासाठी वाकसई तलाठी कार्यालयात प्रकरण दिले.
नोंदणी पूर्वी तलाठी कार्यालयातून सर्वांना नोटिसा गेल्याने पटेल यांच्या निदर्शनास हे प्रकरण आले. त्यानंतर त्यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर त्याने सदरचे दस्त रद्द करण्याच्या बदल्यात काही कोटी रुपयांची मागणी भावेश पटेल यांच्याकडे केली होती.
तेव्हापासून आकाश हा पोलिसांनी चकवा देत पळत होता. मागील सात महिन्यांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. 21 ऑगस्ट रोजी तो सातारा जिल्ह्यात असल्याची माहिती समजल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजया म्हेत्रे, हवालदार सतीश कुदळे, विजय गाले, प्रवीण गेंगजे यांच्या पथकाने सापळा लावत आकाश साळुंखेला सातारा येथून अटक केली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! गणेशोत्सव काळात भारतीय रेल्वेच्या गणपती विशेष ३८० फेऱ्या, पाहा संपूर्ण नियोजन
– तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय ; आमदार सुनील शेळकेंच्या उपस्थितीत बैठक
– मोठा निर्णय ! मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (क्रमांक 48) बोरघाट भागात जड-अवजड वाहनांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

 
			






