Dainik Maval News: शिवली (ता. मावळ) येथे एक दुर्घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे गरीब शेतकऱ्याचे घर आणि आणखीन एका शेतकऱ्याचा गोठा जळून खाक झाला आहे. या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नसली तरीही गोठ्यातील दोन जनावरे होरपळली असून घरातील सर्व साहित्य जळाल्याने शेतकऱ्याचा संसार उघड्यावर आला आहे.
पवन मावळ विभागातील शिवली गावाच्या हद्दीतील खडकवाडी येथे ही घटना घडली. शुक्रवारी (दि.13 डिसेंबर) रात्री नऊ – सव्वा नऊच्या सुमारास अचानक घराला आग लागली. घराचे बांधकाम हे लाकडी असल्याने काही वेळात आगीचा भडका उडाला. अचानक लागलेल्या आगीत दत्तू गणपत ठाकर यांचे घर जळाले. तर घराजवळ असलेला रामदास जाधव यांचा गोठा देखील जळाला.
घरामध्ये एक वयस्कर आजी होत्या, त्यांनी आग लागल्याचे समजताच प्रसंगावधान दाखवून घराबाहेर धाव घेतली, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. परंतु घरातील जवळपास सर्वच साहित्य, धनधान्ये, कागदपत्रे, संसारपयोगी साहित्य जळून गेले. यावेळी घराजवळ असणाऱ्या गोठ्याला देखील आग लागली. या आगीत गोठ्यातील दोन जनावरे होरपळली असून गोठा देखील जळून खाक झाला.
सदर दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सदर शेतकऱ्यांना प्रशासनाने आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात देणे आवश्यक आहे. ‘घर जळाल्याने आमचा संसार उघड्यावर पडला आहे. घराचे मोठे नुकसान झाले असून घरातील संसारोपयोगी वस्तूही जळाल्या आहेत. प्रशासनाने आम्हाला मदत करावी हीच आमची अपेक्षा आहे,’ अशी प्रतिक्रिया दत्तू ठाकर यांचा मुलगा सतिश ठाकर यांनी दिली.