Dainik Maval News : आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 अभियानांतर्गत मावळ तालुक्यातील सहकारी गृह रचना संस्थांचा ‘हौसिंग दरबार’ व प्रतिनिधी संवाद बैठक, रविवारी (दि.17) सकाळी वडगाव मावळ येथील विशाल लॉन्स येथे झाली. या बैठकीत वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. आमदार शेळके व अधिकारी यांनी गृह संस्थांच्या प्रतिनिधींकडून विविध प्रकारच्या समस्या जाणून घेतल्या.
बैठकीत आलेल्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही केली जाईल, तसेच शासकीय फंडाच्या मदतीने सोसायट्यांमधील आवश्यक कामे पूर्ण करून दिली जातील. गृहरचना संस्थांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 80 टक्के निधी देण्याबरोबरच सोसायट्यांमधील जिम, क्लब हाऊसमधील वस्तू, अंतर्गत रस्ते आदी विकासकामांसाठी प्रत्येक सोसायटीला 10 ते 25 लाख रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि हा निधी एका वर्षाच्या आत मिळेल, अशी घोषणा यावेळी आमदार सुनील शेळके यांनी केली.
- बिल्डरांनी काम न केल्यास त्यांना पाठीशी घालणार नाही, तसेच गरज पडल्यास पीएमआरडीए कार्यालय बंद पाडण्याची भूमिका घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. बांधकामांमध्ये पार्ट कम्प्लिशन कोणालाही दिले जाणार नाही, याचीही ग्वाही त्यांनी दिली. तालुक्यातील हाऊसिंग सोसायट्यांचे एकत्रीकरण करून गृहनिर्माण सोसायटी फेडरेशन स्थापन करण्याची योजना असल्याचे आमदारांनी जाहीर केले.
तसेच, त्यांच्या कार्यालयात आलेल्या तक्रारींपैकी 99 टक्के अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही शेळके यांनी आश्वासन दिले. बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी निर्माण केलेला गोंधळ संपवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी हमी देत त्यांनी 20 हजार कुटुंबांच्या प्रश्नांवर लवकरच तोडगा काढण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीत सहकारी गृहनिर्माण संस्थांना भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडण्यात आल्या. संस्थांच्या नोंदणी आणि व्यवस्थापनात येणाऱ्या अडचणी, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा आणि उपनियमांचे पालन न केल्याने प्रशासकीय अडथळे, काही ठिकाणी मालमत्तेच्या मालकी हक्कांबाबत निर्माण झालेले वाद तसेच पुनर्विकासाच्या प्रक्रियेत नियम व मंजुरीसंदर्भातील अडचणी, आर्थिक बाबतीतील अनेक समस्या, काही सदस्य मेंटेनन्स वेळेवर भरत नाहीत, ज्यामुळे सोसायटीला आर्थिक अडचणी येतात. बँकांकडून कर्ज मिळवताना अडथळे निर्माण होतात.
काही ठिकाणी आर्थिक अपव्यय आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी येतात. पुनर्विकासासाठी आवश्यक निधी उभारणी करणेही कठीण होते. इमारतींच्या नियमित देखभाल व दुरुस्तीमध्ये सातत्याने समस्या उद्भवतात. पाणीपुरवठा, वीज, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये त्रुटी, लिफ्ट, पार्किंग आणि सुरक्षा व्यवस्थापनातील अडथळे, सभासदांमधील परस्पर संवाद आणि विश्वासाच्या अभावामुळे अंतर्गत वाद आणि गटबाजी आदी प्रश्नांकडे उपस्थित सोसायटी प्रतिनिधींनी लक्ष वेधले.
पुनर्विकासाच्या संदर्भातील अडचणी, योग्य बिल्डरची निवड करताना येणाऱ्या समस्या, पुनर्विकासाच्या अटींवर असहमती, बिल्डरकडून अटी पाळण्यात कुचराई, पुढील कायदेशीर कारवाईबाबत अनिश्चितता, सरकारी प्राधिकरणांशी समन्वय साधताना येणाऱ्या अडचणी, महापालिका, एमएचएडीए, विद्युत विभाग, जलपुरवठा विभाग यांच्यासोबत काम करताना अडचणी येतात. मिळकत कर आणि अन्य करांसंबंधी समस्या सतत उद्भवतात अशा अशयाच्या अडचणी यावेळी मांडण्यात आल्या.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश जगताप, महाराष्ट्र राज्य हाऊसिंग सोसायटी फेडरेशन सदस्य सुभाष कर्णिक, मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रवीण निकम, मावळचे सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर, पीएमआरडीएच्या सहाय्यक रचनाकार श्वेता पवार, तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता मनोज क्षीरसागर, पवना उप अभियंता सचिन गाडी, इंद्रायणी उपाभियंता राहुल गव्हाणकर, पुणे हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे सचिव आशिष सातकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रेखा टोगरे, नायब तहसीलदार गणेश तळेकर, तालुक्यातील सर्व नगरपरिषद, पीएमआरडीए, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, महावितरण, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल भूमी अभिलेख या विभागांचे अधिकारी तसेच सर्व सहकारी गृह रचना संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सरकारची लाडक्या बहिणींवरील माया आटली ! ‘या’ महिलांची नावे वगळणार, दरवर्षी करावी लागणार ई-केवायसी । Ladki Bahin Yojana
– वडगावकरांचा लाडका शिवम, दीक्षा समारंभानंतर बनले ‘महक ऋषी’ ; दीक्षा समारंभासाठी भक्तीचा महापूर । Maval News
– खळबळजनक ! गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चार जणांचा एकावर प्राणघातक हल्ला, मावळ तालुक्यातील घटना । Maval Crime