Dainik Maval News : सोलापूर-पुणे महामार्गावर अनोळखी महिलांना टेम्पोत बसवणे एका चालकाला महागात पडले असते, सुदैवाने सरडेवाडी येथील स्थानिक नागरिक आणि इंदापूर पोलिसांच्या तत्परतेने वेळीच मदत पोहोचल्याने चालकाचे अडीच लाख रुपये वाचले. या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील दोन महिलांना अटक केली असून, त्यांच्यावर इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत चालक सरताज चाँद सय्यद (वय ४०, रा. सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते शुक्रवारी (ता. २१) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास टेम्पोत (क्र. एमएच १४ केक्यू ३२०७) भरलेला माल सोलापूर जिल्ह्यातील करकंब येथे उतरवून पुन्हा पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) येथील बाह्यवळण मार्गावर दोन महिलांनी हात करून थांबवण्याची विनंती केली.
त्यानुसार त्यांनी वाहन थांबवले. या महिलांनी भिगवण येथे जायचे असल्याचे सांगत वाहनात बसल्या. त्यानंतर काही अंतर आल्यानंतर इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील टोलनाक्याच्या लगत महिलांनी फिर्यादी यांना, ‘तुझ्याकडे काय पैसे व किमती सामान असेल ते काढून दे, नाहीतर तू आमची छेडछाड केली, असे सांगू,’ अशी धमकी. त्यामुळे फिर्यादीने गाडी थांबविल्यानंतर त्या दोन महिलांनी धक्का देवून गाडीच्या कपड्यातील पैसे जबरदस्तीने काढून घेऊन उतरून पळू लागल्या.
त्यावेळी फिर्यादीने गाडीतून उतरून, ‘चोर चोर’ असा आरडाओरडा केला. त्यावेळी तेथे लोक जमले. त्यांनी त्या दोन्ही महिलांना पकडले. त्यावेळी गर्दीतून इंदापूर येथील अजिंक्य जावीर यांनी पोलीसांना फोन केला. त्यानंतर तत्काळ त्या ठिकाणी इंदापूर पोलिस पोचले. त्यांनी त्या दोन्ही महिलांना पुढील कार्यवाहीसाठी पोलिस ठाण्याला आणले.
यावेळी पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यांची नावे राणी सिकंदर शिंदे (वय ४१) व स्वाती वसंत शिंदे (वय २४, दोघीही रा. मोरवंची, ता. मोहोळ, जि. सोलापूर), अशी निष्पन्न झाली. यावेळी पोलिसांनी झडती घेतली असता राणी हिच्या जवळील काळ्या रंगाची पर्समध्ये फिर्यादीचे दोन लाख पन्नास हजार रुपये मिळून आले.
त्यावरून या दोघींच्या विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात येथे गुन्हा दाखल केला. याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पुंडलिक गावडे करत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा