Dainik Maval News : मंगळवारी (दि. २० मे) संपूर्ण लोणावळा शहर आणि परिसराला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. मागील दोन तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण होतेच, सोबत कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी देखील कोसळत होत्या. परंतु मंगळवारी दुपारनंतर सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने लोणावळेकरांची चांगलीच दाणादाण उडवली.
बुधवारी (दि. २१ ) सकाळी घेतलेल्या माहितीनुसार, लोणावळा शहर आणि परिसरात २४ तासात ६६ मीमी अर्थात २.६० इंच इतका पाऊस झाला. यासह चालू वर्षातील एकूण पाऊस १३९ मीमी अर्थात ५.४७ इंच इतका झाला आहे. मान्सून पाऊस येण्यास अजून बराच अवधी शिल्लक आहे. तोपर्यंत बिगरमोसमी पाऊस बरसत आहे. परंतु हा पाऊस देखील जोराने कोसळत असून पावसाळा सुरू झाला असे वाटावे, असे चित्र निर्माण झाले आहे. लोणावळा हे तालुक्यातील सर्वाधिक पर्जन्यमान असणारे शहर असून गतवर्षी लोणावळ्यात ६०१३ मीमी अर्थात २३६.७३ इंच इतका पाऊस झाला होता. तर गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत केवळ ५४ मीमी पाऊस होता, तोही बिगरमोसमी. यंदाही अवकाळी पाऊस झाला असून तो मात्र १३९ मीमी झाला आहे. अजून मान्सून सुरू होण्यास अवकाश असून तो पर्यंत अवकाळीचा कहर पाहायला मिळेल, असे चित्र दिसत आहे.
लोणावळा शहरात दाणादाण !
लोणावळा शहरात मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली होती, तेव्हा थोडा वेळ पाऊस पडल्यानंतर काहीशी विश्रांती घेऊन सायंकाळी पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने शहरात अनेक ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेली काही दिवसांपासून शहरातील काही प्रभागात ड्रेनेज लाइन, रस्ते दुरूस्तीचे काम सुरू आहे. ती कामे अद्याप पूर्ण न झाल्याने सदर ठिकाणी रस्त्यावर चिखल झाल्याचे दिसून आले. यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अवकाळी पावसाला जोडून मान्सून बरसू लागल्यास भविष्यात लोणावळेकरांना आणखीन अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यामुळे पावसाळापूर्व उरकायची ती सर्व कामे प्रशासनाने वेळीच उरकून घेणे गरजेचे आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे आगारात पाच नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । Talegaon Dabhade
– ‘स्थानिक’च्या इच्छुकांची धावपळ वाढली ; गाठीभेटी आणि लग्नसोहळ्यातून जनसंपर्क वाढविण्यावर भर
– मोठी बातमी : प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश