Dainik Maval News : मुख्याधिकारी अशोक साबळे यांना पुन्हा लोणावळा नगरपरिषदेचा चार्ज घेण्यास विरोध करीत जागरूक नागरिक मंच व सर्व पक्ष, संघटना यांनी सोमवारी (दि.30) शहरात कडकडीत बंद ठेवत आपला संताप व्यक्त केला. सक्तीच्या रजेच्या नावाखाली पाच दिवसांच्या अर्जित रजेवर गेलेले लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी साबळे हे सोमवारी पुन्हा कामावर रुजू होणार होते.
मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता पाणीपट्टीत 30 टक्के कर वाढ केली. तसेच स्वच्छता विभागातील सात विविध कामांचे ठेके एकत्रित करीत हा एकच ठेका देताना तो 5.5 कोटीवरून थेट 12 कोटी रुपयांवर नेत एका विशिष्ट कंपनीला ठेका मिळवून देत नागरिकांच्या कररुपी पैशात अफरातफर केली असल्याचा गंभीर आरोप साबळे यांंच्यावर लोणावळा जागरूक नागरिक मंचच्या वतीने करण्यात आला आहे.
- लोणावळा शहरातील सर्व व्यापारी, टपरी संघटना, भाजी व फळ मंडई, हॉटेल व्यावसायिक, लहान मोठे विक्रेते या सर्वांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत पाठिंबा दिला. अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या होत्या. सकाळी सव्वा अकरा वाजता लोणावळा जागरूक नागरिक मंच, सर्व पक्ष व संघटना पदाधिकारी तसेच नागरिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र जमून निषेध व्यक्त केला. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दिनांक 19 सप्टेंबर रोजी जागरूक नागरिक मंचच्या वतीने विविध मागण्यांसाठी चक्री उपोषण जाहीर केले होते. मात्र उपोषण करण्यासाठी लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने परवानगी नाकारली. तसेच महापुरुष समूह शिल्प असलेल्या भागाला कुलूप लावून बंद केले. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने थेट नगरपरिषद इमारतीमध्ये घुसत मुख्याधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर संतप्त जमावाला शांत करीत मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी मुख्याधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवीत असल्याचे सांगितले. त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा शहरात स्वाक्षरी आंदोलन आयोजित करण्यात आले होते. असे असताना सोमवारी, दि.30 सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी पुन्हा कार्यालयात रुजू होणार असल्याचे मंचच्या सभासदांना समजल्यानंतर पुन्हा लोणावळा शहर पोलिसांना निवेदन देत मुख्याधिकारी यांना कार्यालयात येऊ न देण्याची विनंती केली. तसेच लोणावळा शहर बंद ठेवत ‘मुख्याधिकारी हटाव’ ही मागणी करण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सरकारच्या २ एकर जमीन वाटपाला पवना धरणग्रस्तांचा तीव्र विरोध, प्रत्येकी ४ एकरवर शेतकरी ठाम !
– कामशेत येथील आश्रम शाळेतील 300 विद्यार्थिनींना ‘गुड टच – बॅड टच’चे धडे । Kamshet News
– शहरातील रस्त्यांची दुरवस्था कायम, खासदार श्रीरंग बारणे अधिकाऱ्यांवर संतापले ; पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश