Dainik Maval News : “लोणावळा नगरपरिषदेमधील मी अशा कोणत्या फाईल बाहेर काढणार होतो, म्हणून माझी उमेदवारी नाकारली. संपूर्ण मावळ तालुका तुमच्या विरोधात असताना आम्ही रक्ताचे पाणी करत तुम्हाला निवडून आणले. त्यावेळी आम्ही तुम्हाला म्हटलं नाही तुमच्या सोबत कसे येऊ? तुमच्याकडे किती पैसे आहेत? असे विचारले नाही, पण तुम्ही आम्हाला निवडणुकीला पैसे लागतात, तुमची पैशाची तयारी किती, अशी विचारणा केली. मावळ तालुक्याच्या विकासाला कोट्यवधी रुपयाचा निधी देणाऱ्या माझा मित्राने पाच कोटी मध्ये उमेदवारी विकली” असा गंभीर आरोप सूर्यकांत वाघमारे यांनी केला आहे.
सुर्यकांत वाघमारे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत लोणावळा नगरपरिषदेसाठी आरपीआय ( आठवले गट ) व शिवसेना पक्षाच्या युतीकडून उमेदवारी अर्ज भरला. तत्पूर्वी आयोजित रॅलीत वाघमारे यांनी हे वक्तव्य केले. वाघमारे म्हणाले, कार्यकर्त्यांना न्याय द्यायची वेळ आली तेव्हा तुम्ही आमच्याकडे पाठ फिरवली. वेळ येते, वेळ जाते, पण माणूस कायम लक्षात राहतो, असे म्हणाले.
सूर्यकांत वाघमारे म्हणाले 25 वर्षांपूर्वी ज्यांच्यामुळे नगरपालिका बरखास्त झाली व मी नगराध्यक्ष झालो. आज त्यांच्याच मुळे मी पुन्हा एकदा नगराध्यक्ष होणार आहे, कारण तुम्ही त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. लोणावळा नगरपरिषदेमध्ये भ्रष्टाचार मुक्त कारभार चालवण्यासाठी मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे. ज्यांनी 25 वर्षांपूर्वी 27 लाख रुपयाला पाण्याचा टँकर दाखवला एका स्विमिंग पूलचे 11 वेळा टेंडर काढले व भ्रष्टाचाराचा कळस गाठला अशाच व्यक्तींना तुम्ही पुन्हा उमेदवारी दिली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर सूर्यकांत वाघमारे यांनी निशाणा साधला आहे.
वाघमारे म्हणाले मी जेव्हा मुलाखतीसाठी गेलो तेव्हा मला तुम्ही किती भ्रष्टाचार करणार, असा प्रश्न विचारला गेला त्या प्रश्न उत्तरांमध्ये मी मागे पडलो. म्हणून माझी उमेदवारी नाकारली गेली. मी दुसऱ्या मित्र पक्षांकडे गेलो तेथे त्यांनी तुमच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, अशी विचारणा केली व माझ्यावर गुन्हे नाहीत मग तुम्हाला उमेदवारी कशी देऊ, असे म्हणत माझी उमेदवारी नाकारली. ज्यांना मी कायम साथ दिली त्या माझ्या दोन्ही मित्र पक्षांनी माझा घात केला आहे, असे शब्द त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला उमेदवार दुकानातून कधीही बाहेर आला नाही, पण मी 24 तास नागरिकांमध्ये असणारा उमेदवार आहे. आमदार सुनील शेळके यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या भाषणाचा समाचार घेताना वाघमारे म्हणाले, अजित दादा एकीकडे तुम्ही लाडक्या बहिणीचा सन्मान करता व दुसरीकडे तुमचा आमदार लाडक्या बहिणीचा अपमान करत आहे, असे म्हणत आमदारांच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली आहे.
लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतर सूर्यकांत वाघमारे यांना सर्वांनी शुभेच्छा देत उमेदवारी घ्यावी अशी मागणी केली होती. आमदार सुनील शेळके यांनी आरक्षण पडण्यापूर्वीच जर आरक्षण पडले तर वाघमारे साहेब तुम्ही उमेदवारी घ्या अशी गळ घातली होती. माझ्या उमेदवारीसाठी ते सकारात्मक होते मी सकारात्मक होतो मग माशी शिंकली कोठे, तुमच्यासोबत असणारे माझ्याकडे डोळे वटारून पाहत असले तरी जनता माझ्यासोबत आहे असे सांगत आमदार सुनील शेळके यांच्या जवळील लोकांचाही त्यांनी समाचार घेतला.
वाघमारे म्हणाले लोणावळा नगर परिषदेमध्ये असलेल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पद्धतीने शहराचा विकास केला आहे, मात्र पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कोणतीही कामे झालेली नाहीत. आगामी काळामध्ये पर्यटनाला चालना देत येथील नागरिकांना त्यामधून रोजगार उपलब्ध करून देण्यावर माझा भर असणार आहे.
निवडणुका आल्या की कोटीवधी रुपये गुंतवायचे, खर्च करायचे, मतदारांना आमिष दाखवायचं व आत मध्ये गेल्यानंतर डबल टिबल पैसे करायचे असा व व सर्वसामान्यांना बोलत आपण द्यायच्या असा कार्यक्रम सध्या सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी लोणावळकर जनतेला आवाहन केले म्हणाले, ही निवडणूक पाच वर्षाची आहे, पक्ष बघू नका, बाकी काही बघू नका, उमेदवार गरीब आहे पण सच्चा आहे, प्रामाणिक आहे. जनतेची कामे करणारा कर्तुत्ववान आहे, त्याला पाठिंबा द्या.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – वाचा अधिक
– नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका : उमेदवारी अर्जाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, ‘ही’ चूक बिलकूल करू नका
