Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषदेची निवडणूक सध्या होत असून २ तारखेला मतदान होणार आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या सरळ लढत असून अन्य पक्षांचेही उमेदवार रिंगणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार मोहीमेला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद आता शहराच्या राजकारणात नवे समीकरण तयार करत आहे.
दिनांक २२ नोव्हेंबर रोजी नगरसेवक पदाचे उमेदवार मुकेश परमार, नगरसेविका पदाच्या उमेदवार वसुंधरा दुर्गे (प्रभाग क्र. ५) तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र बबनराव सोनवणे यांनी नांगरगाव परिसरात नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आगामी निवडणुकीत मतदानासाठी आवाहन केले. या दौऱ्याला स्थानिक नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष लक्षवेधी ठरला.
लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराला दिवसेंदिवस जोर मिळत असून, प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद हा पक्षाच्या वाढत्या बळकटीचा सूचक मानला जात आहे. आमदार सुनील शेळके यांनी मागील काळात लोणावळा शहरात व परिसरात केलेल्या विकासकामांचा ठसा नागरिकांच्या मनात पक्का असून, त्यांच्याच विश्वासावर उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
“आमदार सुनील शेळके यांनी दिलेले सर्व उमेदवार आम्हाला मान्य आहेत; त्यांनी केलेला विकास आमच्या डोळ्यासमोर आहे,” अशा स्वरात नागरिकांमध्ये चर्चा घडताना दिसत आहे.
विशेष म्हणजे, आमदार शेळके यांना जसा जनतेने विश्वासाने साथ दिली होती, त्याच विश्वासाने या उमेदवारांनाही मतदान करण्याची तयारी लोकांनी दाखवली आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवारांना मिळत असलेला प्रतिसाद, विशेषतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र सोनवणे यांना मिळालेली पाठराखण ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी निवडणूकसरशीचे स्पष्ट संकेत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
लोणावळ्यातील वातावरण पाहता, नागरिक आता गर्दी करून प्रचार दौऱ्यांना, गाठीभेटींना उपस्थित राहत असून उमेदवारांना प्रचंड उत्साहाने प्रतिसाद देताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी निर्माण झालेली ही सकारात्मक लाट पाहता, येणारी निवडणूक पक्षासाठी भक्कम फरकाने जिंकण्याची शक्यता असल्याची चर्चा शहरात वेगाने पसरत आहे.
लोणावळा नगरपालिकेची ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढवली जात असून, नागरिकांचा स्पष्ट कल राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकत असल्याचे चित्र आता अधिक ठळक होत चालले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade

