Dainik Maval News : राज्यातील अन्य कोणत्याही भागात नसेल, इतक्या नाट्यमय राजकीय हालचाली मावळ तालुक्यात होताना दिसत आहे. शहरी आणि ग्रामीण असा दुहेरी संगम असलेला मावळ तालुका जितका पर्यटन व कृषीसाठी संपूर्ण राज्याला परिचित आहे, तितकाच तो याठिकाणी होणाऱ्या राजकीय घडामोडींसाठीही परिचित आहे. आताही मावळात एक महाराजकीय नाट्याचा पट मांडला जात आहे. दरवेळीप्रमाणे पटावरील मोहरे तेच आहे, पण यावेळची खास बाब म्हणजे ह्या खेळात गाजर हे समोरच्या प्रतिस्पर्ध्यास न दाखविता, ते हा खेळ पाहणाऱ्या सामान्य जनतेला दाखविले जात आहे.
मुद्दा आहे, आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्याअनुषंगाने मावळात घडत असलेल्या राजकीय घडामोडी. आता मावळातील कोणत्याही मतदाराला किंवा सामान्य नागरिकास हे वेगळं सांगण्याची गरज नाही की, राज्यात जी महायुती आहे, ती मावळ तालुक्यात मात्र अस्तित्वात नाही.
मावळात महायुती नाही, हे आम्ही याठिकाणी अत्यंत जबाबदारीने लिहितो आहे. गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीपासून मावळ तालुक्यात महायुती अस्तित्वात नाही. मग आमदार सुनील शेळके हे महायुतीचे उमेदवार होते, निवडणुकही महायुतीचे उमेदवार म्हणून लढले, मग ते काय होतं? तर मावळात सध्या अस्तित्वात असलेली महायुती ही आमदार सुनील शेळके यांनी घडवून आणलेली युती आहे. ज्यात आमदार सुनील शेळके यांना समर्थन देणारा भाजपाचा एक गट त्यांच्या सोबत आहे, शिवसेना (एकनाथ शिंदे यांची) त्यांच्या सोबत आहे आणि आरपीआय, एसआरपी हेही पक्ष त्यांच्या सोबत आहे.
इथे मुद्दा उरतो तो म्हणजे भाजपाचा. विधानसभा निवडणुकीपासून भाजपाचा एक मोठा गट आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात राहिला आहे, तो गट विधानसभेलाही आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात होता आणि तो गट आगामी निवडणुकांतही आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात अर्थात आमदार सुनील शेळके यांनी घडवून आणलेल्या युतीविरोधात असणार आहे, असा आमचा अंदाज आहे. मग मुद्दा उरतो, तो राज्यात असलेल्या महायुतीचा.
जर भाजपाचे दोन गट असतील आणि ते भाजपात राहुन एकाच तालुक्यात वेगळं वेगळं राजकारण करत असतील आणि त्यावर वरिष्ठ भाजपाचे कोणतेही अंकूश नसेल, तर अशा राजकारणाला आणि त्याचा परिणाम म्हणून निर्माण होणाऱ्या युतीला महायुती म्हणू नये, किमान आम्ही तरी म्हणू शकत नाही, आणि मावळच्या जनतेनेही हे सत्य स्वीकारले पाहिजे, असे आमचे प्रामाणिक मत आहे.
याचा अर्थ, आमदार सुनील शेळके हे त्यांनी घडवून आणलेल्या युतीचे मावळचे आमदार आहेत, हे सत्य जर वरिष्ठ नेतृत्वाने स्वीकारले आहे आणि भाजपाचा एक गट मावळात वेगळा राहून आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात काम करीत राहील, हेही सत्य वरिष्ठ नेतृत्वाला मान्य असेल, तर मग मावळच्या जनतेसमोर ‘महायुती होईल / होणार / होऊ शकेल’ हे गाजर तरी का दाखवायचं ??
इथे मुद्दा येतो ते सर्वसामान्य मावळच्या मतदारांचे मतपरिवर्तित करण्याचा. मावळची जनता ही राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे. कदाचित यामुळेच मावळकर निवडणुका आल्यानंतर विकासाच्या मुद्द्यांपेक्षा राजकीय मुद्द्यांवर अधिक बोलताना दिसतात. अशा या सामान्य जनतेची नस ओळखलेले मावळातील सर्वच आघाडीचे ‘नेते मंडळी’ आता या संवेदनशीलतेचा फायदा उचलताना दिसत आहे. त्यातूनच महायुती, जागा वाटप ह्या राजकीय गोष्टी ज्या पडद्याआड व्हायला हव्यात, त्या व्यासपीठावर होताना दिसत आहे. मावळच्या सुज्ञ जनतेने यावर योग्य तो विचार करावा !





