Dainik Maval News :पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपळोली गावच्या हद्दीत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर द्रुतगती मार्गावरील वाहनांचा वेग आणि वन्यप्राण्यांचा अधिवास हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत. द्रुतगती मार्गावर वाहनांसाठी अडथळा नसल्याने सर्वच वाहने सुसाट वेगाने धावत असतात. यामुळे अनेकदा अपघात घडतात. आजवर अतिवेगामुळे हजारो अपघात होऊन त्यात हजारो लोक मृत पावले आहेत. दुसरीकडे वाहनांच्या अतिवेगामुळे माणसांप्रमाणेच जनावरांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से ते खालापूर टोलनाक्यापर्यंतचा परिसर हा जंगलांनी वेढलेला आहे. डोंगर दऱ्यातून जाणाऱ्या द्रुतगती मार्गावर याठिकाणी अनकेदा रस्ते अपघातात वन्यजीवांचा जीव गमवावा लागला आहे. रस्ते विकास महामंडळाकडून द्रुतगती मार्गावर जनावरे व इतर प्राण्यांनी प्रवेश करु नये यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक कुंपण घातली आहेत. असे असूनही भेकर, बिबट्या, हरिण यासारखे उंच उडी मारणारे प्राणी रस्ता चुकल्याने किंवा भक्ष्याच्या शोधात रात्री कुंपणावरुन उडी मारुन थेट द्रुतगती मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी मार्गावरून जोराने जाणारी वाहनांची धडक वन्यप्राण्यांना बसते व त्यातून अपघात होऊन वन्यप्राणी आपला जीव गमावतात किंवा गंभीर जखमी होतात.
अनेकदा संबंधित वाहनांचाही भीषण अपघात होऊन प्रवाशांना इजा होते. प्राप्त माहितीनुसार गेल्या अडीच दशकात येथे तीन बिबटे, दोन तरस, तीन भेकरांसह अनेक ससे व इतर छोट्या प्राण्यांचा मृत्यू झाला होता. द्रुतगती मार्गावर वाहनांचा वाढीव वेग वन्यप्राण्यांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे द्रुतगती मार्ग असला तरीही जंगल भागातून जाताना वाहनचालकांनी वाहनाचा वेग कमी करावा. रस्त्यालगत प्राणी दिसल्यास हॉर्न वाजवावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार