Dainik Maval News : लोणावळा शहरातील (Lonavala) अनधिकृत टपऱ्यांवर होणाऱ्या कारवाईच्या अनुषंगाने आमदार सुनिल शेळके (MLA Sunil Shelke) यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण बैठक सोमवारी, दि.3 मार्च पार पडली. सदर बैठकीत टपऱ्यांच्या अतिक्रमणाबाबत आणि त्यावर होणाऱ्या कारवाईसंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली.
लोणावळा शहरातील टपऱ्यांविषयी नागरिकांच्या तक्रारी निवडणुकीपूर्वीच समोर आल्या होत्या. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये आयोजित जनसंवाद दौऱ्यादरम्यानही वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत टपऱ्यांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या. त्यानुसार, नगरपरिषदेने अशा अनधिकृत टपऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले.
दहापेक्षा अधिक वर्षे अस्तित्वात असलेल्या टपऱ्यांना संरक्षण
दरम्यान सोमवारच्या बैठकीत ठरवण्यात आले की, नगरपरिषदेच्या जागेतील 10 ते 15 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या आणि टपरी संघटना व नगरपरिषदेकडे अधिकृत नोंद असलेल्या टपऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तसेच, हॉकर्स झोनच्या माध्यमातून पुनर्वसन होईपर्यंत या टपऱ्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना नगरपरिषदेला देण्यात आली.
अनधिकृत अतिक्रमण आणि बेकायदेशीर भाडेप्रकरणी कठोर कारवाई
नगरपरिषदेच्या जागेवर जबरदस्तीने शेड उभारून भाडे घेत असेल, टपऱ्या बेकायदेशीररित्या भाड्याने दिल्या जात असतील किंवा अधिकृत नोंद असलेल्या जागेव्यतिरिक्त अतिक्रमण केलं जात असेल, अशा प्रकरणांवर निर्णयपूर्वक कारवाई करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.
महत्वाचं म्हणजे याच बैठकीत नगरपरिषदेच्या कारवाईवरही आक्षेप नोंदवण्यात आला. पालिकेकडून कारवाई हेतुपुरस्पर केली जात असून, पहिली कारवाई गोरगरीब टपरीधारकांवर केली जात असल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे कोणत्या टपऱ्यांवर कारवाई करायची, याबाबत आधी सर्वेक्षण करून ठोस निर्णय घ्यावा, अशी सूचना नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.
तसेच बैठकीत ठरवण्यात आले की, ज्या गोरगरीब टपरीधारकांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन हीच टपरी आहे, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. तसेच, राजकीय कारणास्तव कोणत्याही गरजू व्यक्तीवर अन्याय होऊ नये, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी सूर्यकांत वाघमारे, विलास बडेकर, वसंतराव काळोखे, नारायण पाळेकर, दत्तात्रय येवले, अरुण लाड, देविदास कडू, निखिल कविश्वर, संजय भोईर, जीवन गायकवाड, परेश बडेकर, मंजू वाघ, उमा मेहता, आरोही तळेगावकर, कमलसिंह म्हस्के, रविंद्र पोटफोडे, बाबासाहेब ओव्हाळ, अमित भोसले यांसह मोठ्या संख्येने टपरीधारक उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक