Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदा, नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने युती – आघाडी करणे, उमेदवारांची चाचपणी करणे यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनीही वेळोवेळी आपली भूमिका सांगताना निवडणुकीची दिशा स्पष्ट केली आहे. मावळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रबळ असून यामुळे आमदार शेळके हे संपूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे दिसते. त्यातच आजवर आमदार सुनील शेळके यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तीन उमेदवारांची जवळपास घोषणा केली आहे. यामुळे निवडणुकीचे वातावरण बनू लागले आहे.
पहिला उमेदवार – श्री संतोष दाभाडे
आमदार सुनील शेळके हे ज्या शहरातून येतात, ते शहर म्हणजे तळेगाव दाभाडे शहर. या तळेगाव दाभाडे शहराची नगरपरिषदेची निवडणुक होणार आहे. या निवडणुकीसाठी आमदार सुनील शेळके यांच्या पक्षाने अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागविले असून जवळपास 83 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. परंतु शहराच्या नगराध्यक्षपदासाठी आमदार सुनील शेळके यांनी कित्येक दिवसांपूर्वीच भारतीयय जनता पार्टीचे संतोष दाभाडे – पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच वारंवार त्यांच्या उमेदवारीचा पुरस्कारही केला आहे.
दुसरा उमेदवार – श्री सत्यम खांडगे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांचे चिरंजीव श्री सत्यम खांडगे यांनाही आमदार सुनील शेळके यांनी जवळपास उमेदवारी जाहीर केली आहे. नवरात्रोत्सव निमित्त तळेगाव दाभाडे शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये सत्यम खांडगे यांनी आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार सुनील शेळके यांनी प्रभाग क्रमांक सात मधून सत्यम खांडगे यांना नगरपरिषदेत पाठवायचे आहे, असे सांगताना त्यांच्याही उमेदवारीची जवळपास घोषणा केली आहे. तशी तयारी सत्यम खांडगे यांनी सुरू केली आहे.
तिसरा उमेदवार – सौ सुनिता येवले
आमदार सुनील शेळके यांनी जाहिर केलेला तिसरा उमेदवार म्हणजे सुनिता मनोज येवले. शनिवारी ( दि. 25 ) चांदखेड येथे मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त “खेळ पैठणीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके उपस्थित होते. कार्यक्रमात मनोगत व्यक्त करीत असताना आमदार सुनील शेळके यांनी चांदखेड गणातून पंचायत समितीकरिता मा. सरपंच मनोज येवले यांच्या पत्नी सुनिता मनोज येवले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मावळ पंचायत समितीकरिता पहिला उमेदवार जाहीर करीत असल्याचे सांगत आमदार सुनील शेळके यांनी चांदखेड गणातून सुनिता मनोज येवले यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! आमदार सुनील शेळके यांच्याकडून पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर
– पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजितदादा तळेगावातील कार्यक्रमापासून चार हात दूर? राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा, जाणून घ्या सविस्तर
– आस्मानी संकटाची चाहूल… मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी संकटात । Maval Taluka




