Dainik Maval News : प्रतिनिधी – संध्या नांगरे : आपल्या देशाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे अर्थातच आपल्या देशाचे संविधान. भारताचे हे संविधान सामान्य नागरिकांपर्यंत पोचवून ते समजून सांगण्याचं महत्वाचं आणि अनमोल कार्य करणारी आपली आजची दुर्गा आहे, संविधान संवादक शितल यशोधरा (वय ३८). सामान्य नागरिकांवर विशेषतः बालमनांवर संविधानाचे संस्कार करण्यासाठी त्या जीवापाड मेहनत घेत आहे. घर, मुलं, चांगल्या पगाराची नोकरी अशा सुखवस्तू संसारात समाधान न मानता त्या भारतीय संविधानासाठी प्रत्यक्ष समाजात उतरल्या आहेत. या दुर्गेचं निराळं कार्य शब्दातीत आहे.
शितलताई पुण्याच्याच आहेत. सध्या त्या विश्रांतवाडी परिसरात स्थायिक आहेत. ताईंचं शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत व खडकीतील जी.एम.आय. गर्ल्स हायस्कूलमध्ये झालं. सन २००३ मध्ये पुण्यातील सी.डब्ल्यू.आय.टी. महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदविका व सन २००८ मध्ये पदवी पूर्ण केली. याच दरम्यान ताईंनी नोकरी केली, त्यांचा विवाह झाला. सध्या त्या पुण्यातील कंपनीत इंजिनिअर आहेत. घर आणि नोकरी चोख सांभाळून स्वयंस्फूर्तीनं समाजासाठी सिंहाचा वाटा उचलत आहेत. ( Indian Constitution Propagators Shital Yashodhara )
- शितलताई शाळेत अभ्यासात हुशार होत्या. सातत्यानं वर्गात प्रथम क्रमांक पटकावायच्या, शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहानं सहभागी व्हायच्या. ताईंचे आजोबा आणि वडील थोडेफार समाजकार्यात सक्रीय होते, त्यामुळं घरात वेगवेगळी पुस्तकं आणली जायची. घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी व्हायची. ताईंच्या मामाने त्यांना वाचनाची गोडी लावली.
मोठं होईल तसं ताईंनी अनेक पुस्तकं वाचली. महाविद्यालयात असताना त्यांना शेलार सर प्राध्यापक होते. या शेलार सरांची अध्यापनाची पद्धत, त्यांचे विचार, त्यांचा वावर या गोष्टी इतरांपेक्षा वेगळ्या असल्यानं शितलताईंना भावल्या व सरांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव ताईंवर पडला. या सर्व वातावरणामुळं उमलत्या वयातच शितलताईंवर समाजकार्याचे संस्कार झाले होते.
सन २०१६ मध्ये विश्रांतवाडी येथे श्रामणेर संघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात मिलिंद जावळे यांनी शितलताईंना राजमाता जिजाऊ यांच्यावर एकपात्री सादरीकरण करण्याची जबाबदारी सोपवली. या एकपात्री प्रयोगासाठी ताईंनी अभ्यास करुन संहिता लिहिली, प्रयोग उत्तम सादर केला आणि इथंच शितलताईंची प्रत्यक्ष समाजात जाऊन काम करण्याची सुरवात झाली. मग, ‘मी जिजाऊ बोलतेय’, ‘मी झलकारी बोलतेय’, बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावरील नाटिका, स्त्री-भ्रूणहत्या या विषयावर भारुड एकपात्री प्रयोग सादर केले. भीमनगरमध्ये एका संस्थेद्वारे गरजू मुलांसाठी घेतल्या जणाऱ्या वर्गात ताई विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम शिकवू लागल्या व त्यासोबतच दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यासाठी चागंल्या गोष्टींचे धडे देऊ लागल्या.
सन २०२० दरम्यान कोल्हापूर येथील लोकराजा राजर्षी शाहू संविधान संवाद प्रशिक्षण समितीनं संविधान संवादक घडविण्यासाठी ऑनलाइन वर्ग घेतले, त्यात शितलताई सहभागी झाल्या. संविधानाचे भरपूर ज्ञान मिळवले आणि वर्ग संपताना ताईंनी स्वरचित ‘मी संविधानाची प्रास्ताविका बोलतेय’ हा आगळावेगळा एकपात्री प्रयोग सादर केला. तो सर्वांना अतिशय आवडू लागला. त्याचंही नंतर अनेक ठिकाणी सादरीकरण केलं आणि हीच शितलताईंची ‘संविधान संवादक’ या भूमिकेची सुरवात होती. त्यानंतर ताईंनी संविधानविषयक जागृती कार्याला वाहून घेतलं आहे.
- सध्या सोमवार ते शुक्रवार नऊ ते सहा ताईं नोकरी करतात आणि दर शनिवार-रविवार हे त्यांनी संविधान संवादासाठी दिले आहेत. संविधान संवाद समिती पुणे शाखेच्या ताई सचिव आहेत. पिंपरी-चिंचवड व पुण्यातील मधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या संविधानाचे धडे दिलेत. वस्त्यांमध्ये जाऊन लहान मुलांना, नागरिकांना, महिलांच्या गटांना संविधानाची ओळख करुन दिली आहे. विविध कार्यक्रमांत संविधानाशी निगडीत विषयांवर व्याख्यानं दिली आहेत.
ताईंना लहान मुलांशी संवाद साधायला फार आवडतं. त्यांनी लहान मुलांसाठी संविधानाची अतिशय सोप्या शब्दात ओळख करुन देणारी गाणी, बडबडगीतं व काही गोष्टी रचल्या आहेत आणि ही गाणी-गोष्टी मुलं आवडीनं ऐकतात, म्हणतात. उत्सुकतेनं समजून घेण्याचा प्रयत्न करतात. महिलांना त्या ओवीतून संविधान समजून देतात. संविधानाचं भारुडही त्यांनी रचलं आहे. संविधान निर्मिती प्रक्रीयेत सहभागी असलेल्या महिलांबद्दल त्यांनी अभ्यास करुन माहिती संकलन केलं आहे. ‘संविधान गावाला जाऊया’ हा बालमेळावा संविधान संवाद समिती घेत असते.
शितलताईंनी लहान मुलांसाठी ‘वाचू आनंदे’ हा ऑनलाइन वाचनाचा उपक्रम २०२१-२२ मध्ये सुरु केलाय. दररोज हा ऑनलाइन हा वाचन वर्ग भरतोय आणि लहानग्यांना वाचनाची गोडी लागतेय. ‘Where is Bhidevada?’ या लघुपटात ताईंनी सावित्रीबाई फुले यांची छोटीशी भूमिका साकारलीये. नुकत्याच झालेल्या सत्यशोधक युवा परिषदेत त्यांनी ‘Think Tank – शोध सथ्य धर्माचा’ हे नाटक सादर केलं.
संविधानानं दिलेला समतेचा विचार आचरण्यासाठी त्या स्वतःच्या नावात अडनाव न लावता शितल यशोधरा असा नामोल्लेख करताहेत. भारतीय संविधान सामान्य नागरिकांना आणि प्रामुख्यानं उद्याच्या सुजाण नागरिकांना समजावून देण्याचा वसाच त्यांनी घेतला आहे. शितलताईंच्या सामाजिक कामातून त्यांच्या मुलांवरही सामाजिक जाणीवेचे सुंदर संस्कार होत आहेत. संविधान जागृतीच्या या परिणामकारक कार्यासाठी शितलताईंना अनेक सन्मान लाभले आहेत.
शितलताई म्हणतात, “आपलं संविधान निर्माण होऊन एवढी वर्ष होऊन ते नागरिकांपर्यंत पोचलं नाही. म्हणून ते सोप्या पद्धतीनं समजून सांगण्याचा संविधान संवाद समितीचा उद्देश आहे. संविधानसाठी काम करणं ही माझी ओढ आहे. त्यात मला आनंद वाटतो. समाजात जागृती करण्यात आपला हातभार लागतो याचं समाधान मिळतं. माझं संविधान संवादकाचं काम असंच पुढं सुरु राहणार आहे. महिलांनी आपली चौकट विस्तारुन आपल्याला आवडणारया गोष्टी केल्याच पाहिजेत.”
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अभिवादन नवदुर्गा : ‘दैनिक मावळ’च्या नवदुर्गा – 2023
1. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘मुलींच्या शिक्षणासाठी ती झालीये सरस्वती अन् लक्ष्मी’, गोष्ट वनिता सावंत यांच्या ध्येयाची…
2. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । प्रबोधन गीतांच्या सादरीकरणातून त्या करताहेत लोकजागर; नकुसाबाई लोखंडेंचा प्रेरणादायी जीवनप्रवास
3. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘आईच्या मायेने वंचित लेकरांना ती घडवतेय…’ समाजसेविका गौरी सोनवणे यांची प्रेरणादायी वाटचाल
4. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । कुटुंबाचा विरोध झुगारून ती बनली बस कंडक्टर; वाचा ‘डॅशिंग लेडी कंडक्टर’ रेश्मा सय्यद यांचा जीवनप्रवास
5. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचताना बहरलीये ‘फुलराणी’, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा थक्क करणारा प्रवास
6. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । तिच्याच ‘लेखणीनं’ सोडवली तिची चौकटीतील घुसमट; कवयित्री कल्पना दुधाळ यांचा वाखण्याजोगा लेखनप्रवास
7. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । शिल्पकाराने घडवले लेकीच्या जीवनाचे शिल्प; शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांची कलाप्रांतातील जडणघडण
8. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । खाद्यपदार्थांच्या व्यवसायाने आला आयुष्यात गोडवा; कष्टप्रद वाटेवरुन चालणाऱ्या रजनीताई कराळेंची संघर्षकहाणी
9. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रसिकमनावर बिंबलाय तिच्या स्वरातील अन् वाणीतील गोडवा; प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामलेंची भरारी