Dainik Maval News : प्रतिनिधी – संध्या नांगरे : मोठेपणी काहीतरी बनण्याचं स्वप्न आपण लहानपणी पाहत असतो. ही स्वप्न पूर्ण करताना कोणी ना कोणी आदर्श व्यक्ती आपल्यासमोर असते. या अभ्यासू मुलीसाठी तिचे बाबाच तिचा आदर्श होते. बाबांसारखंच काम करायचं तिनं ठरवलं होतं. प्रचंड मेहनत घेत ठरवलेल्या ध्येयाच्या दिशेनं ती मार्गक्रमण करत राहिली आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं…. ती डॉक्टर बनली. ही सुंदरशी, लखलखीत वाटचाल करणारी आपली आजची दुर्गा म्हणजे डॉ. निखिलेशा शेटे (वय २८). आजघडीला स्वतःचा दवाखाना सुरु करुन तिनं स्वतःला सिद्ध केलं आहे.
निखिलेशाताई मूळच्या भिलार गावच्या. आई-वडिल, बहिण, भाऊ असं चौकोनी त्यांचं कुटुंब. ताईंचं शालेय शिक्षण गावातच झालं. अकरावी -बारावी विज्ञान शाखेचं शिक्षण पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयातून वसतीगृहात राहून पूर्ण केलं. ताईंचे वडील पेशानं डॉक्टर असल्यानं लहानपणापासून ताई बाबांचं काम पाहायच्या आणि प्रभावीत व्हायच्या. मोठी झाल्यावर मलाही डॉक्टर बनायचंय असं वाटायचं आणि पुढं ताईंनी तसा निश्चियही केला.
बारावीनंतर वैद्यकीय शिक्षणासाठीची NEET परीक्षा निखिलेशाताई उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या. बी.एच.एम.एस. पदवीसाठी जयसिंगपूरच्या जे.जे. मगदूम होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आधी वसतीगृहात राहायचा अनुभव असला तरी सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत महाविद्यालयाची वेळ, त्यानंतर अभ्यास आणि स्वतःची कामं हे सगळं पेलवताना जड गेलं. व्यस्त दिनक्रमात ताईंनी झोकून देऊन, रात्र-रात्र जागून अभ्यास केला. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतही त्या उत्साहानं सहभागी व्हायच्या. तिथं डॉ. गझाला सय्यद विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक होत्या. त्या घर आणि करिअर या दोन्ही गोष्टींची व्यवस्थित सांगड घालून कार्यरत असल्यानं निखिलेशाताईंवर त्यांचा प्रभाव होता.
‘बीएचएमएस’च्या प्रत्येक वर्षी ताई प्रथम तीन क्रमांकांमध्ये स्थान पटकवायच्या. शेवटच्या वर्षी महाविद्यालयात द्वितीय क्रमांक मिळवून सन २०१९ मध्ये निखिलेशाताई डॉक्टर झाल्या. आपली लेक आपल्या पावलावर पाऊल ठेवत वैद्यकीय क्षेत्रात आली याचा, ताईंच्या बाबांना फार आनंद झाला. लेकीच्या अभिमानानं त्यांचा उर भरुन आला.
पुढं, ताईंनी गावातच स्वतःचा दवाखाना सुरु केला. दोन वर्षांनी त्या पुढंच्या शिक्षणासाठी पुन्हा पुण्यात आल्या. संजीवन रुग्णालयात कार्यानुभवाचा भाग पूर्ण करुन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वर्षभर नोकरी केली. त्यानंतर Emergency Medical Services (P.G.D.E.M.S) हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि आत्ताच M.D. (Homeopathic) पदवीही प्राप्त केली आहे.
दरम्यान, सन २०२२ मध्ये निखिलेशा ताईंचा विवाह झाला. त्यांचे पती संचित तेलवणे अभियंता असून त्यांनाही पत्नीचं मोठं कौतुक आहे. पतीच्या नोकरीनिमित्त ताई पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झाल्या आहेत. स्वतःचं वेगळं अस्तित्व-स्थान निर्माण करण्याचा निखिलेशाताईंचा निश्चय होता. त्यांना स्वतःचा दवाखाना सुरु करायचा होता. शहरात स्थायिक झाल्यावर त्यांनी विविध परिसरात गल्लोगल्ली फिरुन जागा शोधली, दवाखाना सुरु केला आणि आता रहाटणी परिसरातील त्याचं ‘साई क्लिनीक’ प्रसिद्ध आहे. रुग्णांचं पद्धतशीर समुपदेशन, नेमके औषधोपचार आणि उत्तम सेवा या विशेष गोष्टींमुळं डॉक्टर निखिलेशा परिसरातील नावाजलेल्या डॉक्टर आहेत.
सकाळी घरातील स्वयंपाक व इतर कामं उरकून त्या दवाखान्यात येतात. दुपारच्या वेळेत घरी जाऊन रात्रीचा स्वयंपाक, आवराआवर करतात आणि पुन्हा सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंत दवाखान्यात असतात. या व्यस्त दिनक्रमातून वेळ मिळेल तसं अभ्यास करतात. डॉक्टर निखिलेशा ताईंचं प्रसन्न हसरं आणि प्रसन्न व्यक्तिमत्वच पाहून रुग्णांना दिलासा मिळालेला असतो. त्यांचा दवाखानाही स्वच्छ, नीटनेटका आहे आणि भविष्यात आपला दवाखाना आणखी मोठा करायचा ताईंचा मानस आहे.
‘आपण डॉक्टर बनायचं’ हा ताईंचं ध्येय इतकं पक्कं होतं की त्याशिवाय इतर कोणत्याही क्षेत्राकडं वळण्याचा विचार त्यांच्या मनी कधी आला नाही. आज आपली ध्येयपूर्ती करुन डॉक्टर निखिलेशा स्वयंप्रकाशानं उजळल्या आहेत. त्यांची वाटचाल युवतींना प्रेरणा देणारी आहे.
डॉक्टर निखिलेशा म्हणतात, “माझ्या हातून रुग्णांचा त्रास कमी होतोय, लोकसेवा घडतेय याचं मला फार समाधान वाटतं. माझी डॉक्टर बनण्याची इच्छा मी पूर्ण केलीये. यात माझी आई माझा कणा बनली आहे. प्रत्येक स्त्री कुटुंबासाठी अखंडपणे झटते पण तीनं स्वतःचं आरोग्य आणि प्रगतीकडं कटाक्षानं लक्ष दिलं पाहिजे.”
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अभिवादन नवदुर्गा : ‘दैनिक मावळ’च्या नवदुर्गा – 2023
1. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘मुलींच्या शिक्षणासाठी ती झालीये सरस्वती अन् लक्ष्मी’, गोष्ट वनिता सावंत यांच्या ध्येयाची…
2. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । प्रबोधन गीतांच्या सादरीकरणातून त्या करताहेत लोकजागर; नकुसाबाई लोखंडेंचा प्रेरणादायी जीवनप्रवास
3. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘आईच्या मायेने वंचित लेकरांना ती घडवतेय…’ समाजसेविका गौरी सोनवणे यांची प्रेरणादायी वाटचाल
4. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । कुटुंबाचा विरोध झुगारून ती बनली बस कंडक्टर; वाचा ‘डॅशिंग लेडी कंडक्टर’ रेश्मा सय्यद यांचा जीवनप्रवास
5. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचताना बहरलीये ‘फुलराणी’, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा थक्क करणारा प्रवास
6. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । तिच्याच ‘लेखणीनं’ सोडवली तिची चौकटीतील घुसमट; कवयित्री कल्पना दुधाळ यांचा वाखण्याजोगा लेखनप्रवास
7. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । शिल्पकाराने घडवले लेकीच्या जीवनाचे शिल्प; शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांची कलाप्रांतातील जडणघडण
8. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । खाद्यपदार्थांच्या व्यवसायाने आला आयुष्यात गोडवा; कष्टप्रद वाटेवरुन चालणाऱ्या रजनीताई कराळेंची संघर्षकहाणी
9. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रसिकमनावर बिंबलाय तिच्या स्वरातील अन् वाणीतील गोडवा; प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामलेंची भरारी