Dainik Maval News : जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रवासी नागरिक सतत हैराण होत आहेत. मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी वाहतुक कोंडीचे ब्लॅक स्पॉट आहेत. या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना होताना काही दिसत नाही. वडगाव शहर हद्दीतील वडगाव फाटा हा वाहतूक कोंडीचा नवा स्पॉट ठरत असून येथे वाहतूक नियोजनाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
वडगाव फाटा हे मावळ तालुक्यातील एक महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. या ठिकाणी दररोज सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. तळेगाव-चाकण फाट्यावर दररोज होणाऱ्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यात आता ह्या फाट्यावर देखील वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
तळेगाव ‘एमआयडीसी’कडे जाणारी वाहने वडगाव फाट्यावरुन वळसा घेऊन जातात. तसेच याठिकाणाहून वडगाव शहरात एन्ट्री केली जाते. यावेळी मुंबई बाजूकडून येणारी वाहने याच चौकात येतात. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. अशात वडगाव शहरात जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडून वाहने घेऊन जावे लागते.
मुंबई बाजूकडून येणारी वाहने उतार असल्याने भरधाव येतात. आजवर या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. येथे ना सिग्नल आहे, ना वाहतूक पोलीस असतात. परिणामी हा फाटा आता वाहतूक कोंडीसाठी नवा ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत चालला आहे. त्यामुळे येथे उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या चौकात सिग्नल नसल्याने पोलिसांची नेमणूक करावी, तळेगाव-चाकण फाट्यावर ज्या पद्धतीने दुभाजक तोडून चौक मोठा केला. त्याच धर्तीवर या ठिकाणी चौक मोठा करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ ; क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार
– पोरांनो… तयारीला लागा ! महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
– रोजगार हमी योजना समितीचे प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यात प्रकल्प पाहणी ; लाभार्थ्यांशी थेट संवाद
