देशामध्ये 1975 ते 1977 या कालावधीत घोषित आणिबाणी ( Emergency ) कालावधीत बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तिंना गौरवार्थ मानधन देण्याबाबतची योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानुसार ऑगस्ट 2020 ते ऑक्टोबर 2022 असे 27 महिन्यांच्या मानधनाची एकूण 12 कोटी 17 लाख 2 हजार 500 रुपये रक्कम पात्र 515 लाभार्थ्यांना वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. याव्यतिरिक्त या योजनेत नव्याने 23 पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आल्याने एकूण लाभार्थीसंख्या 538 झाली आहे. ( Pension To Persons Imprisoned During Emergency Period Pune District )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
देशामध्ये 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत आणिबाणी घोषित करण्यात आली होती. या कालावधीत मिसा अंतर्गत तसेच डी. आय. आर. (आणिबाणी) राजनैतीक अथवा सामाजिक कारणासाठी बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तींचा सन्मान व यथोचित गौरव करण्याबाबत धोरण राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील 3 जुलै 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आलेले आहे. या धोरणानुसार एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा 10 हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस/ पतीस 5 हजार रुपये; तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना 5 हजार रुपये तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस / पतीस दरमहा २ हजार ५०० रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तथापी, ही योजना 31 जुलै 2020 च्या शासन निर्णयानुसार बंद करण्यात आली होती. परंतु, राज्य शासनाने 28 जुलै 2022 रोजी शासन निर्णय जारी करुन पुन्हा ही योजना सुरु केली असून ऑगस्ट 2020 पासूनचे सर्व महिन्यांचे मानधन वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या लाभार्थ्यांचे मानधन फरकासह जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेले असून तात्काळ तहसील निहाय वितरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
त्यानुसार पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या यादीतील एकूण 515 लाभार्थ्यांना फरकासह 27 महिन्यांचे मानधन वितरीत करण्यात येणार आहे. तसेच चौथ्या यादीतील नव्याने पात्र 23 लाभार्थ्यांना ऑगस्ट 2022 ते ऑक्टोबर 2022 अशी 3 महिन्यांच्या मानधनाची 5 लाख 40 हजार रुपये इतकी रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.
तहसीलनिहाय एकूण लाभार्थीसंख्या (कंसात नव्याने पात्र लाभार्थी संख्या) :
पुणे शहर – 238 (9), हवेली- 161 (8), अपर तहसील पिंपरी चिंचवड – 61 (4), खेड – 4 (1), मुळशी – 8 (1), भोर – 13, मावळ – 19, दौंड- 3, बारामती- 3, पुरंदर- 2, जुन्नर- 3, शिरुर- 22 आणि इंदापूर- 1 लाभार्थी
अधिक वाचा –
– मोठी कारवाई! पुणे विभागात तब्बल 30 लाख 37 हजार रुपयांचा गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त
– अट्टल चोरट्यास जेरबंद करण्यात लोणावळा पोलिसांना यश, ग्रामस्थ-तरूणांची मोठी मदत