Dainik Maval News : बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता नजरेच्या टप्प्यात आल्या आहेत. यात सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटांच्या आरक्षण सोडतीचा दिवस सोमवारी उजाडला. मावळ पंचायत समितीच्या दहा गणांची आरक्षण सोडत वडगाव येथे पार पडली. तर, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे जिल्हा परिषदेच्या गटांची आरक्षण सोडत पार पडली. दरम्यान गण आणि गट यांच्या आरक्षण सोडतीनंतर मावळच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.
गेली अनेक महिने जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांचे स्वप्न सोमवारच्या आरक्षण सोडतीनंतर भंगले आहे. यात विशेष म्हणजे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण जागेसाठी अर्थात खुल्या प्रवर्गासाठी असल्याने मावळातील अनेक दिग्गजांनी थेट जिल्हा परिषद सदस्य होण्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी कंबर कसली होती. परंतु सोमवारी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष होणे तर दूर पण सदस्य होण्याचेही स्वप्न भंगले आहे.
मावळमधील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण
पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मावळ तालुक्यात असणाऱ्या पाच गटांपैकी तीन गटांत महिला आरक्षण पडले आहे. तर उर्वरित एक गट अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निश्चित झाला असून अन्य एक गट सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गासाठी राखीव राहिला आहे.
मावळमधील गटनिहाय आरक्षण
टाकवे-वडेश्वर गट : अनुसूचित जमाती
इंदुरी- वराळे गट : सर्वसाधारण महिला
खडकाळे – कार्ला गट : सर्वसाधारण महिला
कुसगाव – काले गट : सर्वसाधारण
सोमाटणे – चांदखेड गट : सर्वसाधारण महिला
इच्छुकांकडून आता पत्नीच्या तिकीटासाठी जोर
स्वतःचे जिल्हा परिषद सदस्य होणे हुकल्यानंतर आता बहुतांश गटातील इच्छुक उमेदवारांनी आरक्षण पाहून आपल्या पत्नीचा चेहरा उमेदवार म्हणून समोर केला आहे. अनेक गटांत हीच परिस्थिती असून आयत्यावेळी केलेला खर्च आणि आजवर केलेली धावपळ वाय न घालविता, रिंगणातून बाहेर पडण्याऐवजी पत्नीला निवडणुकीच्या रिंगणांत उतरविण्याची तयारी हिरमोड झालेल्या इच्छुकांकडून करण्यात आली आहे. तसेच पत्नीच्या तिकीटासाठी जोरही लावला जात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव
जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा