Dainik Maval News : तळेगाव ते चाकण महामार्गावरील प्रचंड खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून अखेर तळेगावकर नागरिकांनी पीडब्ल्यूडी विभागाच्या गलथान कारभाराविरोधात मराठा क्रांती चौकात आमरण उपोषणास सुरुवात केली. अनेक वर्षांपासून या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले आहेत आणि निरपराध नागरिकांचे प्राण गेले आहेत. वारंवार तक्रारी करूनही पीडब्ल्यूडी विभागाकडून दुरुस्तीचे कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. या निष्क्रियतेविरोधात अखेर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
या आंदोलनाला तळेगाव परिसरातील जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असून या रस्त्यावरील खड्ड्यांचा इंदोरी येथील नागरिकांना देखील मोठा त्रास होत असल्याने या आंदोलनाला प्रशांत दादा भागवत यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला. “नागरिकांचा आवाज हा शासनाने ऐकला पाहिजे. विकासकामांच्या नावाखाली जीव धोक्यात येत असतील, तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,” असे मत प्रशांत दादा भागवत यांनी यावेळी व्यक्त केले.
तळेगाव ते चाकण महामार्ग हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि रुग्णवाहिका प्रवास करतात. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. वाहनधारकांची कंबरडे मोडली आहेत, रुग्णवाहिकांना अडथळे निर्माण होत आहेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अखेर जनतेने आपला रोष व्यक्त करत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. प्रशांत दादा भागवत यांच्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळाले असून, शासन आणि प्रशासनावर दबाव वाढला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
– अखेर बिगुल वाजले ! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
– देवस्थानच्या शेतजमिनी हडप करणाऱ्यांचा खेळ खल्लास ! सरकारचा मोठा निर्णय