Dainik Maval News : बापूसाहेब भेगडे हे अपक्ष नव्हे तर मावळातील जनतेचे उमेदवार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठ नेतेमंडळीच्या मार्गदर्शनाखाली पुढील 50 वर्षांचे नियोजन करून मावळ तालुक्यातील गेल्या पाच वर्षांत थांबलेल्या विकासाला पुन्हा गती देण्याचे काम करायचे आहे, अशी भूमिका काँग्रेसचे नेते रामदास काकडे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
रामदास काकडे म्हणाले की, मावळ तालुक्याच्या विकासात सरदार दाभाडे राजघराणे, मदन बाफना, कृष्णराव भेगडे, रघुनाथदादा सातकर, बी. एस. गाडे पाटील, रुपलेखा ढोरे, दिगंबर भेगडे, बाळा भेगडे या सर्वांचे मोठे योगदान आहे. त्यांनी तालुक्याच्या विकासाला सातत्याने गती देण्याचे काम केले, मात्र गेल्या पाच वर्षात तालुक्याच्या विकासाला पूर्णपणे खिळ बसली आहे. तालुक्याची संस्कृती बिघडून वेगळ्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. एकाधिकारशाही, हुकूमशाही मोडून काढून मावळ तालुक्यात पुन्हा चांगले वातावरण निर्माण करायचे आहे. तालुक्याच्या विकासाला गती द्यायची आहे.
बापूसाहेब भेगडे यांचा उमेदवारी अर्ज भरताना एक लाखपेक्षा अधिक लोकांनी गर्दी केली होती. सर्व जनता बापूसाहेबांच्या पाठीशी असल्याने त्यांच्या विजयाची ही त्यांच्या विजयाची नांदी म्हणावी लागेल, असे काकडे म्हणाले. गेल्या पाच वर्षांत तालुक्याचा विकास थांबला आहे. अपप्रवृत्तीचा शिरकाव झाला होता. मावळच्या खऱ्या संस्कृतीकडे नेणारा उमेदवार हवा, म्हणून आम्ही सर्वांनी बापूसाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मावळात परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे, असे त्यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांत तालुक्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बापूसाहेबांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, उद्योजक यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मावळ हे एक कुटुंब आहे. बापूसाहेबांच्या रुपाने महिलांना भाऊ भेटेल. लहान मुले व तरुणांना चांगला मामा मिळू शकेल, असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पै. चंद्रकांत सातकर, भाजपचे नेते रवींद्र भेगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय तथा भाऊ गुंड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्ती शेटे, बाळासाहेब घोटकुले, दत्तात्रय माळी, बाबूराव वायकर, नितीन घोटकुले, सचिन घोटकुले आदी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 12 उमेदवारांचे अर्ज वैध, 6 उमेदवारांचे अर्ज बाद ; पाहा बारा उमेदवारांची नावे आणि पक्ष
– चोरीच्या संशयावरून तरुणाचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime
– नवीन प्रशासकीय इमारत वाढविणार मावळ तालुक्याच्या राजधानीची शोभा !