Dainik Maval News : पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील ७३ सदस्य पदाकरिता आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता, बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. तसेच याच दिवशी पंचायत समिती सदस्य पदांकरिता आरक्षण सोडतीचे संबंधित तालुक्यात आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम २०२५ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. याकरिता सोडत कार्यक्रमाचे १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता तालुकानिहाय आयोजन करण्यात आले आहे.
जुन्नर, आंबेगाव, खेड, मुळशी, वेल्हे आणि पुरंदर पंचायत समितीचे आरक्षण सोडत संबंधित पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तर शिरूर पंचायत समितीची सोडत नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, शिरूर, मावळ पंचायत समिती – भेगडे लॉन्स, वडगांव मावळ, ता. मावळ येथे करण्यात आली आहे.
हवेली पंचायत समितीची सोडत उद्यान प्रसाद कार्यालय, १७१२/१ बी, सी व्ही जोशी मार्ग, खजिना विहीर चौक, माडीवाले कॉलनी, सदाशिव पेठ येथे, दौंड पंचायत समिती – बैठक सभागृह, दुसरा मजला, नविन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, दौंड येथे, भोर – अभिजीत मंगल कार्यालय, भोर महाड रस्ता, भोर येथे, बारामती पंचायत समिती – कवी मोरोपंत सभागृह, इंदापूर रस्ता, बारामती येथे आणि इंदापूर पंचायत समितीची आरक्षण सोडत राधिका रेसिडेन्सी क्लब, इंदापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– पुणे जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी बुधवारी प्रसिद्ध होणार
– लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव मावळ, देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर – पाहा एका क्लिकवर
