Dainik Maval News : महाराष्ट्र विधानसभेत पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नाव बदलून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. पुढील आवश्यक कारवाईसाठी आणि विमानतळाच्या नावात बदल करण्यासाठी हा ठराव आता केंद्राकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर विमानतळाचे नामांतर करण्यात येईल. महाराष्ट्र विधानसभेच्या नियम ११० अन्वये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा ठराव मांडला आणि तो विधानसभेने मंजूर केला. पुणे विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव महाराष्ट्र मंत्रिमंडळाने याआधीच मंजूर केला आहे.
पुण्यातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी मांडला होता. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. संत तुकाराम हे भक्ती चळवळीतील एक महत्त्वाचे संत आणि आध्यात्मिक कवी होते, त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला. तसेच लोहगाव हे विमानतळ संत तुकाराम महाराजांच्या आईचे गाव असल्याचे मोहोळ यांनी आपल्या प्रस्तावात नमूद केले होते.
पुणे जिल्ह्यातील नव्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजयांचे नाव द्यावे आणि विद्यमान विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी सूचना भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी केल्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी म्हटले. तसेच हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत आणून मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, अशीही त्यांनी ग्वाही दिली होती. महत्त्वाचे म्हणजे, विमानतळाचे नाव बदलण्यासाठी आधी विधानसभेची मंजुरी घ्यावी लागते. त्यानंतर भारताच्या राजपत्रात अधिकृतरीत्या अधिसूचित करण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्नामकरणाचा विधानसभेत ठराव –
पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याबाबत शासकीय ठराव विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला. महाराष्ट्र विधानसभा नियम 110 अनुसार लोहगाव विमानतळ, पुणे येथील विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्नामकरणाचा विधानपरिषदेत ठराव –
पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याबाबत शासकीय ठराव विधानपरिषदेत मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडला. या ठरावाच्या माध्यमातून महाराष्ट्र विधान परिषद नियम 106 अनुसार लोहगाव विमानतळ, पुणे येथील विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आई-वडिलांच्या भांडणाला घाबरून चिमुकलीने घर सोडले ; वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगी पुन्हा सुखरूप परतली । Talegaon News
– रब्बी हंगामातील पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाची मोहीम, थेट शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
– घराच्या बांधकामावरून लाकडी दांडक्याने जबर मारहाण ; मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime