Dainik Maval News : वर्षा पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या लोणावळा, खंडाळा शहरात खंडाळा महामार्ग पोलिसांकडून पर्यटकांची लूटमार होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना आणि काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी केला आहे. तसेच याबाबत रास्ता रोको आंदोलन करून निषेध नोंदविला आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे च्या खंडाळा एक्झिट याठिकाणी लोणावळा, खंडाळा शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांची वाहने अडवून वाहनांमधील सर्व साहित्यांची तपासणी केली जाते, पर्यटकांची अंग झडती घेतली जाते यातून पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
कुटुंबीयांसह लोणावळा शहरांमध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून कारवाईच्या नावाखाली पैसे उकळले जातात, असा गंभीर आरोप करीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निखिल कवीश्वर आणि शिवसेनेचे माजी पुणे जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे यांनी खंडाळा महामार्ग पोलिसांच्या धोरणा विरोधात खंडाळा एक्झिट येथे गुरुवारी (दि. ३१) रास्ता रोको आंदोलन केले.
कारवाईसाठी अनेक कॅमेरे असताना पोलिसांना गाड्या अडविण्याचा आणि पैसे घेण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांच्यावर आणि त्यांना सोबत घेऊन पर्यटकांची लूट करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? असे प्रश्न कवीश्वर यांनी उपस्थित केले.
खंडाळा महामार्ग पोलिसांच्या या कारवाईमुळे लोणावळा शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून येथील व्यावसायिक देखील त्यामुळे हतबल झाले आहेत.
याविषयी बोलताना निखिल कवीश्वर म्हणाले, खंडाळा महामार्ग पोलिसांच्या वरिष्ठांसोबत याबाबत अनेक वेळा चर्चा केली, त्यांना सूचित करून हे पॉईंट बंद करण्यासंदर्भात विनंती केली. लोणावळा उपविभागाचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी देखील हे सर्व पॉईंट त्यांच्या कार्यकाळामध्ये ताकीद देऊन बंद केले होते.
मात्र, कार्तिक साहेबांची बदली झाल्यानंतर याठिकाणी पुन्हा खंडाळा महामार्ग पोलिसांकडून पर्यटकांची वाहने अडवण्याचे प्रकार सुरू झाले. लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशन, लोणावळा रिक्षा असोसिएशन, लोणावळा व्यापारी असोसिएशन व खंडाळा भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी यानी याबाबत खंडाळा महामार्ग पोलिसांना अनेक वेळा विनंत्या करून देखील त्यांच्याकडून या ठिकाणी पर्यटक वाहनांची तपासणी व कारवाई थांबण्याचे नाव घेत नाही.
यामुळे नसल्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा पवित्रा घ्यावा लागला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनवरून बोलताना आमच्याशी हा पॉईंट बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्यास यापेक्षा मोठे आंदोलन या ठिकाणी उभे करू असा इशारा देखील कवीश्वर यांनी दिला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित होणार
– देहू नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन ; मिळकत धारकांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा । Dehu News
– तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार; घटना सीसीटीव्हीत कैद
– चाकण, नाशिक फाटा येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; मंत्रालयात विशेष बैठक संपन्न