राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख तथा अध्यक्ष शरद पवार हे आज (गुरुवार, दि. 7 मार्च) लोणावळा दौऱ्यावर आले होते. लोणावळा येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता संवाद मेळावा होता. हा पुर्वनियोजित कार्यक्रम असल्याने महाविकासआघाडीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मावळ तालुक्यातील शरद पवार गटाने ह्या मेळाव्याचे आयोजन केले होते. शरद पवार हे लोणावळ्यात पोहोचल्यावर त्यांचे तुतारी फुंकून आणि जेसीबीने फुलांची उधळून करून जंगी स्वागत करण्यात आले. तसेच क्रेनच्या सहाय्याने एक भलामोठा हारही पवारांना घालण्यात आला. यावेळी तालुक्यातील सुमारे शंभराहून अधिक कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला. दरम्यान मेळाव्यात मनोगतादरम्यान बोलताना शरद पवार यांनी मावळचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांच्यावर जोरदार टीका केली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
आधी भाजपा आणि केंद्र सरकारवर निशाणा –
शरद पवार यांनी मनोगतात सुरुवातीला केंद्र सरकार आणि राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘देशात भाजपाकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबले आहे. आता ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागे लागले आहेत. केजरीवाल गेल्या 10 वर्षांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. दिल्लीत उत्तम काम करत आहेत. त्यांना आता क्राईम ब्रँचने समन्स धाडले आहे. निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना अटक करण्याची भाजपाची योजना आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकल्यानंतर भाजपाची आता दिल्लीवर नजर आहे. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात अनिल देशमुखांना सहा महिने तुरुंगात डांबून ठेवलं होतं. तर ‘सामना’चे (शिवसेनेचं मुखपत्र) संपादक आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही चार महिने तुरुंगात अडकवलं होतं. कारण राऊत हे सामनातून भाजपावर टीका करतात. म्हणजे या देशात बोलण्याचं आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही.’ असे पवार म्हणाले. ( Sharad Pawar criticizes MLA Sunil Shelke Sharad Pawar Speech at Lonavala Maval Constituency )
सुनिल शेळकेंना इशारा आणि सज्जड दम –
‘मी इथे आलो तेव्हा मला सांगण्यात आलं की, इथल्या काही लोकांनी आणि स्थानिक आमदाराने (मावळचे आमदार सुनील शेळके) आजच्या बैठकीला तुम्ही येताय म्हणून तुम्हाला दमदाटी केली. कोणीतरी त्यांच्यावर टीका केली म्हणून त्यांनी त्या टीकाकारांनाही फोन करून दम दिला. हा काय प्रकार आहे? कोणी चूक केली तर त्यांच्यावर टीका करायची नाही का? लोकशाहीत जाहीर बोलायचं नाही का? कोणी बोललं तर दमदाटी होते. इथले जे आमदार दमदाटी करत आहेत त्यांना मला सांगायचं आहे की, बाबा रे तू आमदार कोणामुळे झालास आठवतंय का? तुझ्या प्रचारसभेला इथे कोण आलेलं आठवतंय का? तेव्हा पक्षाचा अध्यक्ष कोण होता? निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी पक्षाचं चिन्ह लागतं, पक्षाचा फॉर्म लागतो, तो फॉर्म आणि चिन्ह तुला कोणी दिलं? तुझ्या अर्जावर कोणाची सही होती? तू माझ्या सहीने तुझा अर्ज भरला होतास. तुम्ही लोक आज त्याच पक्षाच्या आणि विचारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता? तुला निवडून आणण्यासाठी जे कार्यकर्ते राबले, ज्यांनी तुझ्यासाठी घाम गाळला, त्यांनाच तू दमदाटी करतोस. माझी त्या आमदाराला विनंती आहे. एकदा दमदाटी केलीस, आता बास झालं. पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला. मी या रस्त्याने कधी जात नाही. परंतु, या रस्त्याने जाण्याची स्थिती जर कोणी निर्माण केली तर मी त्याला सोडतही नाही.’ अशा भाषेत शरद पवारांनी आमदार सुनिल शेळकेंना इशारा दिला.
लोणावळा येथे ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षातर्फे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केले.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे प्रमुख श्री. माने, महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री आणि आमचे… pic.twitter.com/yXmoUZKa9g
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 7, 2024
अधिक वाचा –
– वडगाव शहरासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 2 कोटी 45 लाखांचा निधी, ‘ही’ कामे लागणार मार्गी । Vadgaon Maval
– पुण्यातील राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 1 लाख 40 हजार प्रकरणे निकाली, तब्बल 369 कोटी 98 लाखांची वसूली । Pune News
– उमरठ येथील ‘नरवीर तानाजी मालुसरे’ यांच्या समाधीस्थळासाठी 10 कोटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा!