राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज (दि. 7) लोणावळा (ता. मावळ) (Lonavala Maval) येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. यावेळी शरद पवार यांनी मावळे आमदार सुनिल शेळके (MLA Sunil Shelke) यांना जाहीररित्या खडसावले. शरद पवार यांना आमदार सुनिल शेळके हे कार्यकर्ते पदाधिकारी यांना धमकावत असल्याची माहिती देण्यात आली किंवा तसे त्यांच्या पर्यंत पोहोचले, त्यावरून त्यांनी आपल्या मनोगतात आमदार सुनिल शेळके यांचा समाचार घेतला. पवारांच्या या टीकेला आमदार सुनिल शेळके यांनीही लगेचच प्रत्युत्तर दिले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
काय म्हणाले शरद पवार?
आमदार सुनिल शेळके यांना इशारा देताना शरद पवार म्हणाले की, ‘तू आमदार कोणामुळे झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं? त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता? तुझ्या फॉर्म, चिन्ह यासाठी नेत्याची सही लागते ती सही माझी आहे. ज्यानं ही सही केलीये त्याचेच कार्यकर्ते तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले, घाम गाळला त्यांनाच आज तुम्ही दमदाटी करता. माझी तुम्हाला विनंती आहे की, एकदा तुम्ही दमदाटी केलीत, आता बास्स झालं. पुन्हा जर असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला. मी खरंतर तर या रस्त्यानं जात नाही पण जर या रस्त्यानं जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर त्याला सोडतही नाही.” असा सज्जड दमच जणू शरद पवार यांनी आमदार शेळकेंना दिला.
शरद पवारांच्या टीकेला सुनिल शेळकेंचे प्रत्युत्तर –
शरद पवार यांच्या लोणावळ्यातील भाषणानंतर काही वेळातच आमदार सुनिल शेळकेंनी वडगाव मावळ येथे पत्रकार परिषद घेऊन त्यावर स्पष्टीकरण दिले. ‘मेळाव्याचे आयोजन करणाऱ्यांनी शरद पवारांना काही माहिती दिली. मावळमधले शेकडो कार्यकर्ते अजित पवारांना सोडून शरद पवारांबरोबर यायला तयार आहे, तुम्ही त्यासाठी मावळमध्ये या, अशी खोटी माहिती देऊन शरद पवारांना निमंत्रित केले. सुनिल शेळकेंनी कार्यकर्त्यांना कार्यक्रमाला न जाण्याबाबत दमदाटी केल्याचे शरद पवारांना या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शरद पवारांनी त्यावर लगेच प्रतिक्रिया दिली. ते आमच्यासाठी आजही श्रद्धेय आहेत. पण त्यांनी या बाबतीत वक्तव्य करताना शहानिशा करणे अपेक्षित होतं,’ असे सुनिल शेळके म्हणाले.
‘पुरावा द्या.. अन्यथा मी महाराष्ट्रभर सांगेन’
पुढे शेळके म्हणाले की, ‘मी या बाबतीत शरद पवारांना भेटून विचारणार आहे. माझी काय चूक झाली आहे, हे त्यांनी सांगावे. कार्यकर्त्यांनी त्यांना दिलेली माहिती खरी की खोटी, हे त्यांनी तपासून पाहायला हवं होतं. पुढच्या 8 दिवसांत मी ज्याला फोन केला किंवा दमदाटी केली, अशी एक तरी व्यक्ती उभी करावी, नाहीतर मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की शरद पवारांनी मावळमध्ये येऊन माझ्यावर खोटे आरोप केले. शरद पवारांना ज्यांनी माहिती दिली, त्यांनी एकतर पुरावे द्यावेत नाहीतर शरद पवारांनी माझ्या बाबतीत केलेले वक्तव्य खोटं होतं हे सांगावं,’ असे आव्हानच शेळकेंनी पवार यांना केले. ( Sharad Pawar Speech at Lonavala Maval Constituency Ncp Mla Sunil Shelke Slams Sharad Pawar )
अधिक वाचा –
– पुण्यातील राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 1 लाख 40 हजार प्रकरणे निकाली, तब्बल 369 कोटी 98 लाखांची वसूली । Pune News
– उमरठ येथील ‘नरवीर तानाजी मालुसरे’ यांच्या समाधीस्थळासाठी 10 कोटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा!
– श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेची चमकदार कामगिरी, ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक