व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अमृतमहोत्सव एकनाथपर्वाचा !!

मावळच्या जडणघडणीत योगदान देणारे श्री एकनाथराव ( भाऊ ) काशिनाथराव टिळे यांच्या अमृतमहोत्सवी (पंच्चाहत्तरी) अभिष्ठचिंतन सोहळ्यानिमित्त विशेष लेख...

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 30, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Special Article on Occasion of seventy Fifth Birthday Of Eknathrao Tile Maval Bjp Leader

Photo Courtesy : Team Dainik Maval


अमृतमहोत्सव एकनाथपर्वाचा !!

मावळ घडविणारी माणसं कुणी इंग्लंड – अमेरिकेला जाऊन अत्युच्च शिक्षण घेऊन आली नव्हती, “राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ म्हटल्या जाणाऱ्या सह्याद्रीच्या कडेकपारातील गावात राहणारी, पवना, आंद्रा, सुधा, इंद्रायणी यांसारख्या लोकमाताच्या काठावरील साध्यासुध्या माणसांनीच आपला प्रगतशील मावळ घडविला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा तर ज्ञानोबा – तुकोबांच्या ओव्या – अभंगातून विचार घेऊन समाजहिताची कामे केली. मावळच्या जडणघडणीतील असेच एक व्यक्तीमत्व म्हणजेच आपल्या सर्वांचे आदरणीय ‘भाऊ’ अर्थात श्री एकनाथराव काशिनाथराव टिळे.

भाऊंचा जन्म सोमवार, दि. २९ मार्च १९५२ साली आई पार्वताबाई व वडील काशिनाथराव यांच्या पोटी आजोळी ‘शिवली’ येथे शेतकरी कुटुंबात झाला. टिळे दांम्पत्याचे हे पहिले अपत्य. काशिनाथ बाबा उत्तम शेती करीत, त्यास आध्यात्माची जोड असत. घरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम चालत. घरी संघाच्या कार्यकर्त्यांची उठबस चाले. त्यातून छोट्या एकनाथरावांचे व्यक्तिमत्व घडत गेले. स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणाने व श्री. लालकृष्ण अडवाणी यांच्या कार्याने प्रेरित होऊन भाऊ आजही सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला – क्रीडा, व्यवसाय व आध्यात्म यांसारख्या विविध क्षेत्रात काम करीत आहे.

सर्वांचे लाडके ‘भाऊ’
एकनाथरावांना ४ भाऊ व २ बहिणी, एकनाथराव थोरले असल्याने भावंडे त्यांना आदराने ‘भाऊ’ म्हणत. एकनाथरावांनी सरपंच, चेअरमन, सभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त अशी विविध पदे आपल्या जीवनात भूषविली असली तरी, ते सर्वांचे ‘भाऊ’ म्हणूनच काम करतात व लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण त्यांना आदराने ‘भाऊ’च म्हणतात. एकनाथराव हे राजकारणात काम करत. एकनाथरावांचे दुसरे बंध कै. यशवंतराव वडिलांची पारंपारिक पद्धतीची शेती आधुनिक पद्धतीने करत. तर तिसरे बंधू प्रवचनकार आहे, त्यांचे नाव तुकारामबुवा हे जनता बँकेत नोकरीला होते. चौथे बंधू कै. विठ्ठलराव यांनी उत्तमरित्या दुग्धव्यवसाय केला व शेवटचे बंधू असणाऱ्या श्री मच्छिंद्ररावांनी छोटा उद्योग उभारला. कारखान्यात तयार होणाऱ्या छोट्या भागाचा ते टाटा मोटर्स कारखान्याला पुरवठा करीत. एकनाथरावांच्या दोन बहिणी सौ. अलका सदाशिव शेंडगे व सौ. सुभद्रा राजू सावंत. ह्या ६ भावंडांनी एकनाथरावांच्या सामाजिक, राजकीय कार्यात खंबीरपणे पाठीशी उभे राहून मदत केली. भाऊंच्या मामांनी श्री बजरंगराव आडकर यांनी भाऊंना राजकारणात साथ दिली. त्यांच्या साथीने भाऊ राजकारणात एकएक पद मिळवित गेले.

भाऊंचे शिक्षण इ. ४ थी पर्यंतचे शिवणे येथील सरकारी जीवन शिक्षण विद्या मंदिरात झाले, तर पुढचे इ. ७ वी पर्यंतचे शिक्षण पवनानगर येथे झाले. इ. ७ वी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर वडिलांनी कुस्ती शिकण्यासाठी पुण्यातील अग्रवाल तालीमीत पाठविले. कमी उंची, पिळदार शरीरयष्टी, चपळता, आक्रमकता आदी गुणांमुळे अनेक स्पर्धा, आखाडे भाऊंनी गाजविले. मावळ, मुळशी, कोकण, हवेली भागात गावजत्रांमध्ये भाऊंची कुस्ती पाहण्यासाठी लोक गर्दी करायचे. बिनजोड कुस्तीचे मानकरी म्हणूनही बऱ्याच आखाड्यात त्यांचा सन्मान व्हायचा.

लाल मातीचा आखाडा ते राजकारणाचा पट
एकनाथरावांनी इयत्ता ७ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे नामवंत पैलवान म्हणून नावलौकिक मिळविला. घरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी होती. सामाजिक कार्याची आवड, युवकांचे प्रचंड संघटन व अबालवृद्धांचा विश्वासाच्या जोरावर भाऊंनी राजकारणात प्रवेश केला. बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम वर्ष संघ वर्ग शिक्षित असलेले भाऊ समाजाचे प्रश्न सोडवू लागले. गावाने त्यांना सन १९७४ ते १९८४ सलग १० वर्षे शिवणे – सडवली ग्रुप ग्रामपंचायतीचे ‘सरपंच’ केले. सरपंचपदी काम करताना शिवणे, सडवली या दोन्ही गावांतील शाळा, रस्ते, मंदिरे, समाजमंदिरे उभारली. गावाचा पाणीप्रश्न सोडविला. गावातून एसटी सुरू केली. मा. सरपंच कै. बबनराव म्हस्के, कै. गोपींदराव पडवळ, कै. मोरेश्वर साठे यांच्यासारख्या सहकाऱ्यांनी भाऊंना खूप मदत केली. सरपंचपदी काम करताना शेतकऱ्यांपुढील आर्थिक प्रश्नांची त्यांना जाण निर्माण झाली.

‘विना सहकार नाही उद्धार’ हे तत्व ओळखून सहकार क्षेत्रात भाऊंनी प्रचंड योगदान दिले. १९८४ मध्ये भाऊ पवन मावळातील ६८ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या पवना कृषक सहकारी संस्थेचे संचालक व १९८५ मध्ये ते पवना कृषक सहकारी संस्थेचे चेअऱमन झाले. त्याशिवाय शिवणे विविध कार्यकारी सोसायटीमध्ये मागील ३० वर्षांपासून ते चेअरमन व अन्य पदांवर कार्यरत आहेत.

महाराष्ट्रातील भाजपाचे पहिले सभापती
“देहाकडून देवाकडे जाताना मधे देश लागतो व या देशाचे आपण काहीतरी देणे लागतो” या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनी ते काम करीत होते. प्रखर राष्ट्रप्रेम, सामाजिक प्रश्नांची असलेली जाण, सामाजिक प्रश्व सोडविण्याची हातोटी, मोठा नातेवाईक परिवार, फर्डे वक्ते, भारतीय जनता पक्षावर असलेली निष्ठा पाहून भाऊंना भारतीय जनता पक्षाने १९९२ सालच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काले – चांदखेड गटातून उमेदवारी दिली. निवडणुकीत ते प्रचंड बहुमताने निवडून आले व जिल्हा परिषद सदस्य झाले. दरम्यान पंचायत समितीच्या निवडणुकीत मावळात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले. तेव्हा जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समिती सभापती होता येत असे. पक्षाने भाऊंमधील नेतृत्वगुण पाहून त्यांना मावळ पंचायत समितीचे सभापती बनविले.

महाराष्ट्रात प्रथम भाजपाचे सभापती होण्याचा मान त्यांना मिळाला. तेव्हा पंचायत समितीत कै. आमदार दिगंबरदादा भेगडे व कै. आमदार रुपलेखाताई ढोरे यांच्या समवेत काम करताना मावळच्या ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणले. गाव तेथे एसटीची योजना राबविली. बहुजन सामाजाच्या मुलांना शिक्षण मिळण्यासाठी शाळा काढल्या, आरोग्य सुविधा निर्माण केल्या, पंचायत समितीतून शेतकऱ्यांना विविध शेतउपयोगी अवजारांचे वाटप केले. साडेचार वर्षे त्यांनी सभापती पद भूषविले. त्या काळात मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्षास प्रचंड जनाधार निर्माण केला. त्याचा परिणाम म्हणजे पुढील २५ वर्षे मावळात भाजपाचे आमदार निवडून आले. भाऊंचा दांडगा जनसंपर्क, पक्षनिष्ठा, गावांतील अगदी लहान कार्यकर्त्यांशी असलेली ओळख, गावे, शहर, वाड्या – वस्तीपर्यंत भाजपाचे काम, विचार पोहचविण्याचे काम भाऊंनी निष्ठेने केले.

‘एक’निष्ठ भाजपा कार्यकर्ता
राज्यात स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या नेतृत्वात भाजपा वाढत होता. मावळ भाजपाचा बालेकिल्ला बनला होता. त्यात भाऊंचे सिंहाचे योगदान होते. भाऊंची लोकप्रियता वरिष्ठ नेतृत्वाने हेरून त्यांना मावळ तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष केले. त्यांच्या कार्यकाळात ‘गाव तेथे भाजपा’ हे अभियान त्यांनी यशस्वीपणे राबविले. भाजपाचे नेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांना घेऊन ते मोटारसायकलवर गावोगावी फिरले. ग्रामपंचायती, सोसायट्या, पंचायत समितीत भाजपाची सत्ता आणली. मावळात सलग २५ वर्षे भाजपाचा आमदार निवडून आला. काही काळ भाजपाचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले. प्रत्येक जबाबदारीला न्याय देण्याची भूमिका भाऊंनी पार पाडली.

पक्षात नामदार चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री श्री मुरलीधर आण्णा मोहोळ, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा खासदार श्री विनोदजी तावडे, तसेच महाराष्ट्राचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे व कौटुंबिक संबंध राहिले आहेत.

पवनेचा संघर्षयोद्धा
भाऊंचा पिंड हा संघर्षाचा होता. तरुणपणात भाऊंनी आणीबाणी विरोधात सक्रीय आंदोलन केले. शेतकरी कर्जमुक्तीसाठी पक्षाच्या आदेशानुसार मुंबई – नागपूर येथे आंदोलन केले. बेळगाव सीमा प्रश्नाच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. बाबरी मशीद विरोधी आंदोलनात ते कारसेवक म्हणनही सहभागी झाले. पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी आंदोलन त्यांनी उभारले. पवना बंद जलवाहिनी कृती समितीतही त्यांनी सक्रीय काम केले. सदर आंदोलनातील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ३ शेतकरी मृत्यूमुखी पडले. त्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत व वारसांना पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्यात पुढाकार घेतला.

समाजसेवेचा वारसा व वसा
भाऊंना घरातूनच वडिलांकडून वारकरी सांप्रदायाचा वसा व वारसा मिळाला. वै. हभप गोविंदबुवा टिळे व वै. हभप निवृत्ती महाराज टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावांत अखंड हरिनाम सप्ताह सुरु केला. त्यात महाराष्ट्रातून उत्तमोत्तम कीर्तनकार, प्रवचनकार आणून ज्ञानदान व समाजप्रबोधनाचे काम केले. पवन मावळ वारकरी संप्रदायाचे विश्वस्त म्हणून अनेक वर्षे काम केले. आळंदी येथे पवन मावळ दिंडी समाजाची धर्मशाळा उभारण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. वारकरी संप्रदायाबरोबरच भाऊंनी शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड काम केले. डॉ. गजाननराव एकबोटे व श्री मिलिंदजी एकबोटे यांच्या बरोबर पुण्यातील शिक्षण क्षेत्रात त्यांनी प्रचंड काम केले. भाऊ आज प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, मॉर्डन कॉलेज येथे उपाध्यक्षपदी काम करीत आहेत. तसेच ते ह्या संस्थेचे आजीव सदस्य देखील आहेत. पुण्यातील नामवंत मॉर्डन कॉलेजसारख्या ४४ शाखांतून ते लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. शिवणे गावात त्यांनी स्वामी विवेकानंद प्रबोधिनीचे वाणिज्य शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय स्थापन केले आहे. उत्तम शिक्षण घेऊन समाज पुढे जावा ही भाऊंची तळमळ आजही आपल्याला त्यांच्या कार्यातून दिसते.

‘भाऊ’ सहकार क्षेत्रात काम करीत असताना शेतकरी बऱ्याचदा मुला-मुलींच्या शिक्षणाऐवजी थाटामाटात लग्न करण्यासाठी कर्जबाजारी होत. ही समस्या सोडविण्यासाठी भाऊंनी समाजाचा वेळ व पैसा वाचावा, समाजाची मानसिकता बदलावी, शेतकऱ्यांनी लग्नासाठी जमीन विकू नये, यासाठी १९८९ साली भाऊंनी ‘बहिणीचे लग्न’ या नावाने सामुदायिक विवाहसोहळ्याचा प्रयोग केला. १९८९ साली आपल्या बहिणीच्या लग्नात गावातील ९ विवाह, १९९५ साली मुलीच्या लग्नात १० विवाह, पुतणीच्या लग्नात १९ विवाह पार पाडले. कमीत कमी खर्चात लग्न उरकून समाजात एक आदर्श निर्माण केला.

‘एकमेकांस साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संत तुकोबांच्या अभंगाप्रमाणे जीवन जगून भाऊंनी मावळ, मुळशी, हवेली, खेड व शिरूर या ५ तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद भूषविले. याशिवाय पुणे येथील प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद भाऊंनी यशस्वीरित्या सांभाळले.

‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’
‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या उक्तीप्रमाणे भाऊंचा राजकीय, सामाजिक व आध्यात्मिक वसा व वारसा त्यांची मुले समर्थपणे पुढे चालवित आहेत. थोरला मुलगा श्री नंदुशेठ टिळे गावच्या सरपंचपदी, द्वितीय चिरंजीव श्री संभाजीराव टिळे हे शेती व मंडप व्यावसायिक आहेत. मुलगी सुरेखाताई सतिश ठोंबरे ह्या आदर्श गृहिणी म्हणून काम करीत आहेत. तिसरे चिरंजीव श्री धनंजय आण्णा टिळे गावच्या विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, भाजपाचे युवा मोर्चाचे मा. अध्यक्ष व स्वामी विवेकानंद प्रबोधिनीचे सचिव म्हणून काम करीत आहे. तर धाकटे चिरंजीव श्री अजिंक्यदादा टिळे हे मावळ तालुका संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य म्हणून काम करीत असून मावळातील निराधार महिला, अबालवृद्ध यांना मदत करून त्यांचे प्रश्न सोडवित आहेत. पवन मावळात त्यांनी तरुणांचे उत्तम संघटन देखील निर्माण केले आहे.

सर्वसामान्यांचे हित पाहणारे, तसेच राजकीय परिघाबाहेर समाज जीवनाच्या अनेक क्षेत्रात सातत्याने काम करणारे नेते म्हणून एकनाथराव (भाऊ) काशिनाथराव टिळे यांची ओळख आहे. उद्योग क्षेत्रापासून कामगार क्षेत्रापर्यंत, शेतकऱ्यांपासून ते शेतमजूरांपर्यंत राजकारण, कुस्ती, सहकार, शिक्षण, वारकरी, सांप्रदाय अशा समाजाच्या विविध क्षेत्रात वयाच्या पंच्चाहत्तरीतही भाऊ समर्थपणे काम करीत आहेत. पवनामाईच्या या पुत्राचा अर्थात ‘एकनाथपर्वाचा’ हा प्रवास अखंडपणे, निरंतर चालू राहो, अशी प्रार्थना पांडुरंगचरणी करून भाऊंना अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा देऊयात. त्यांना निरोगी व दिर्घायुष्य मिळू दे हिच पवनामाई व ग्रामदैवत श्री भैरवनाथ चरणी प्रार्थना.

शब्दांकन : प्रा. माणकू विष्णू बोंबले


Previous Post

तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट कोसळून तरुणाचा करुण अंत, सोसायटीच्या चेअरमनसह 11 जणांवर गुन्हा दाखल ; तळेगावमधील धक्कादायक घटना

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Special Article on Occasion of seventy Fifth Birthday Of Eknathrao Tile Maval Bjp Leader

अमृतमहोत्सव एकनाथपर्वाचा !!

March 30, 2026
Crime

तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट कोसळून तरुणाचा करुण अंत, सोसायटीच्या चेअरमनसह 11 जणांवर गुन्हा दाखल ; तळेगावमधील धक्कादायक घटना

March 30, 2026
Santosh Raut elected as chairman of public health committee of primary health center in Yelse

येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जन आरोग्य समिती अध्यक्षपदी संतोष राऊत यांची निवड

March 29, 2026
Pune Rural Police Force achieves huge success in e-Governance 150 Days program

पुणे ग्रामीण पोलीस दलाला ई-गव्हर्नन्स १५० दिवस कार्यक्रमात घवघवीत यश ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा गौरव

March 29, 2026
Lonavala Municipal Council Chief Officer cabin opened on orders of District Magistrate

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उघडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन ; लोणावळा नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांचे मनोमिलन

March 28, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड ! पाहा सर्व विषय समित्यांची यादी

March 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.