Dainik Maval News : दररोज हजारो वाहनांची वर्दळ, हजारो नागरिकांची ये-जा असा व्यस्त असणारा तळेगाव – चाकण ते शिक्रापूर महामार्ग आजमितीस प्रवाशांना त्रस्त करून सोडत आहे. महामार्गाच्या दुतर्फा असणारी विविध बांधकामे यामुळे जागोजागी अरूंद झालेला रस्ता, ठिकठिकाणी रस्त्याची झालेली चाळण यामुळे मंद गतीने होणारी वाहतूक, सकाळ-संध्याकाळ ठराविक चौकांत होणारी वाहतूक कोंडी यात तासनतास अडकणारे प्रवासी आणि वाहतूक पोलीस विभागाच्या नियोजना सह अंमलबजावणीचा अभाव यामुळे या मार्गावरून नित्याने प्रवास करणारे सर्वच प्रवासी हैराण झाले असून जवळील अन्य पर्यायी मार्ग नसल्याने त्यांना तळेगाव ते चाकण हा नित्याचा प्रवास आता शिक्षा म्हणून भोगावा लागतो आहे.
वाहतूक कोंडी :
तळेगाव – चाकण रस्तावरील तळेगाव फाटा, तळेगाव शहर, देहूफाटा, खालुंब्रे, एचपी चौक, खराबवाडी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक कोंडीसाठी ही ठिकाणे हॉटस्पॉट बनली आहेत. सकाळ संध्याकाळी येथे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यात कामासाठी जाणारे कामगार, शिक्षणासाठी प्रवास करणारे विद्यार्थी यांचे या वाहतूक कोंडीत प्रचंड हाल होत आहेत.
रस्त्याची चाळण :
तळेगाव, चाकण, शिक्रापूर ह्या शहरांना जोडणारा हा रस्ता जूना आहे. या मार्गावर तळेगाव, चाकण, शिक्रापूर तिन्ही ठिकाणी औद्योगिक वसाहत असून हजारो कंपन्या आहे. त्यामुळे लहान वाहनांसह हजारो अवजड वाहने या मार्गावरून प्रवास करीत असतात. यामुळे जुना असलेला हा रस्ता जागोजागी उखडला असून अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झालेली आहे. साईडपट्ट्या खचल्या आहेत. यातून वाहतूक अपोआप मंदावते.
नियोजनाचा अभाव :
सदर मार्गावर येणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यात वाहतूक पोलीस आणि प्रशासन नेहमीच कमी पडते. काही कार्यक्रम किंवा सण-उत्सव असल्यास ठरल्याप्रमाणे वाहतूक वळविण्यापलीकडे वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काम करताना दिसत नाही. एकीकडे वाहतूक कोंडी होत असतानाही वाहतूक पोलीस नियम मोडणाऱ्यांकडे लक्ष ठेवून दंड वसुलण्यात व्यस्त असलेले दिसतात. भंडारा डोंगर येथील ट्राफिक पोलीस चौकीत अनेकदा अधिकारी, कर्मचारी निवांत बसलेले दिसतात. वाहतूक पोलिसांची अकार्यक्षमता याचाही फटका प्रवाशांना बसतो आहे.
निविदा प्रसिद्ध, पण काम कधी होणार?
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) तळेगाव-चाकण आणि चाकण-शिक्रापूर या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी सुमारे ३१२३.९२ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. तळेगाव ते चाकण हा रस्ता चार पदरी, तर चाकण ते शिक्रापूर हा रस्ता सहा पदरी करण्याचा प्रस्ताव असून, यामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
चाकण, तळेगाव आणि शिक्रापूर हा परिसर औद्योगिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असून, येथे मोठ्या प्रमाणावर उद्योग वसले आहेत. त्यामुळे दररोज अवजड वाहनांची मोठी वाहतूक होते. परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. नागरिक आणि कामगार वर्ग अनेक वर्षांपासून या समस्येचा सामना करत आहेत. रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे पिंपरी- चिंचवड, चाकण, तळेगाव व शिक्रापूर या परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पवना धरणावर धोकादायक पद्धतीने डागडुजी ; धरण 75 टक्के भरलेले असताना सांडव्यावर क्रेन चढवून दुरुस्तीचे काम । Pavana Dam
– लम्पी चर्मरोग प्रादूर्भावामुळे मावळ तालुक्यातील पशूधन धोक्यात ; तातडीने लसीकरण मोहीम हाती घेण्याबाबत प्रशासनाला निवेदन । Maval News
– लोणावळा बस स्थानकाचे रूपडे पालटणार ! टेंडर प्रक्रिया पूर्ण करून लवकर काम सुरू होणार ; परिवहन मंत्र्यांचे आश्वासन । Lonavala News