तळेगाव दाभाडे पोलिसांनी सोमवारी (दि. 20 मे) केलेल्या कारवाईत बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तळेगाव पोलिसांनी सोमवारी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याजवळ ही कारवाई केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सचिन किसन शिंदे (38, रा. लोणीकंद, ता. हवेली), गौरव कमलाकर शिंदे (20, रा. लोणीकंद, ता. हवेली), अजिंक्य दादासाहाबे म्हस्कुटे (25, रा. खामगाव, ता. दौंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे मुंबई महामार्गाने एक चारचाकी वाहन पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात आहे. चारचाकीमधील लोकांकडे पिस्तूल असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. त्यानुसार तळेगाव पोलिसांनी घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला सापळा लावून वाहन अडवले. वाहनामधील तिघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता पोलिसांना एक पिस्तूल आणि चार काडतुसे आढळली. याबाबत तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ( Talegaon Dabhade police action against three persons for possession of illegal weapons )
तिन्ही संशयित पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सचिन शिंदे याच्या विरोधात 2012 मध्ये लोणीकंद पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. तसेच 2021 मध्ये लोणीकंद पोलिस ठाण्यात सचिन आणि गौरव शिंदे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर 2022 मध्ये चिखली पोलिस ठाण्यात गौरव शिंदे आणि अजिंक्य म्हस्कुटे यांच्या विरोधात शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलिस आयुक्त देवीदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण रायन्नवार, उपनिरीक्षक विलास गोसावी, सहायक फौजदार दिलीप कदम, पोलिस अंमलदार किशोर गिरीगोरावी, प्रकाश जाधव, प्रीतम सानप, हर्षद कदम यांच्या पथकाने केली.
अधिक वाचा –
– पुणे हिट अँड रन केस : पुणे शहरातील ‘ते’ दोन पब बंद करण्याचे थेट जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Pune Hit and Run Case
– ‘राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले असते तर…’, निकालाआधीच श्रीरंग बारणेंनी राष्ट्रवादीकडे दाखवले बोट । Maval Lok Sabha
– बारावी बोर्ड परीक्षेत करिना देवकर प्रथम, कार्ला येथील श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेजचा यंदा 94 टक्के निकाल