Dainik Maval News : मावळ तालुक्यातील प्रसिद्ध किल्ले विसापूर च्या पायथ्याशी “सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान” मधील दुर्गसेवकांनी श्री बजरंगबलीचे सुंदर असे मंदिर साकारले आहे. एकेवेळी झाडाझुडुपांत असलेली मारुतीरायाची मूर्ती आता सुंदर अशा मंदिरात विराजमान झाली आहे.
शुक्रवारी मंदिरातील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम, शनिवारी मशाल महोत्सव, शिवपूजा जलाभिषेक, रविवारी मुख्य कार्यक्रम सत्यनारायण महापूजा, पालखी मिरवणूक, मंदिर उदघाटन समारंभ, इतिहास संशोधक प्रमोद बोऱ्हाडे यांचे व्याख्यान, स्नेह भोजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
- 2022 साली “सफर 361 गडांची सामाजिक प्रतिष्ठान” मधील सदस्य विसापूर गडावर चालले होते. तेव्हा गडाच्या वाटेवर त्यांना कसलाही निवारा नसलेली बजरंगबलीची मूर्ती दिसली. या मूर्तीसाठी आपण एक सुंदर मंदिर बनवूया अशी संकल्पना त्यांना सुचली. याविषयी चर्चाही झाली आणि अखेर डिसेंबर 2022 मध्ये मंदिराच्या बांधकामाला सुरवात झाली.
मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे दगड गावा-गावांमधून जुन्या पडक्या घरांचे, मंदिरांचे जमा करून आणण्यात आले. मावळ तालुक्यातील अनेक नेतेमंडळीनी, व्यावसायिकांनी, तरुणांनी या मंदिराच्या बांधकामासाठी पैसे व बांधकाम साहित्य पुरविले. दिवसरात्र एक करून दुर्गसेवकांनी जबाबदारीने काम केले. मंदिरापर्यंत रस्ता नसल्याने चिखल तुडवित मंदिरासाठी लागणाऱ्या सामानाची व मालाची डोक्यावर ने-आण केली.
- अखेर बजरंगबलीचे सुंदर मंदिर प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांकडून साकारले असून या दुर्गसेवकांचे कौतुक होत आहे. मंदिराचे काम पूर्ण झाले असून येत्या रविवारी मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यानंतर भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे.
मंदिराच्या उभारणीसाठी प्रतिष्ठानचे खंडू धुमाळ, ओंकार केदारी, सागर परब, आकाश लालगुडे, कुणाल टाकळकर, प्रीतम उणवणे, राहुल बोरकर, विजय केदारी, सोमनाथ सातकर, दिलीप शिंदे, परशुराम बांगर, योगेश गायकवाड, अभिषेक सातकर, नवनाथ केदारी, शंकर जाधव, रवि केदारी, सोमनाथ म्हसे, सुधीर वाजे, सुधीर तळावडे, विठ्ठल गायकवाड, दिपक पितांबरे यांनी अहोरात्र कष्ट घेतले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक