Dainik Maval News : आंदर मावळ विभागातील वीस गावांतील ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत डाहुली, कुसवली, वडेश्वर, टाकवे, घोनशेत, खांडी, महागाव आदी गावांचे सरपंच, पोलीस पाटील, आशा सेविका, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यक्रमाधिकारी शकील शेख यांनी केले. सकाळच्या सत्रात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद यांनी ग्राम बाल संरक्षणाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात पॉक्सो कायदा तज्ञ प्रशिक्षक सचिन करंजुले यांनी बाल लैंगिक शोषणाविषयी सखोल माहिती देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर चर्चा केली. बाल लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्याचे ज्ञान आणि जबाबदारी याबाबत सदस्यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. प्रशिक्षणार्थींनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश डिंबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन बालविकास विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीमती अंजुमन पटेल यांनी केले. महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग, जिल्हा महिला व बालविकास विभाग, पंचायत समिती मावळ, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन पुणे आणि गेस्टम्प कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– निर्णयाचे ढोल वाजविले… आता पुढे काय ? पुणे – लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्र्रॅकचे काम अद्यापही फायलीत अडकले
– महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’ , गतीमान कारभारासाठी मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय, जाणून घ्या अधिक
– पाणी पुरवठा योजनांची कामे ठरविलेल्या मुदतेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होणार