Dainik Maval News : मंगळवारी ( दि. 4 नोव्हेंबर ) राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार राज्यात 42 नगरपंचायतींच्या निवडणूका होणार असून यात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील वडगाव नगरपंचायतीचा देखील समावेश आहे.
निवडणूक जाहीर झाल्याने वडगाव शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. अशात निवडणूक जाहीर होताच भाजपाकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
सोमवारी वडगाव नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होताच मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांची कन्या अॅड. मृणाल म्हाळसकर यांचे नाव वडगाव शहराच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून समोर आले आहे. वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण स्त्री आहे. आजवर भाजपाकडून नगराध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. परंतु शहरातील भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व असलेले गुलाबराव म्हाळसकर यांच्या लेकीचाच अर्थात वकील मृणाल म्हाळसकर यांचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने भाजपाने नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरविल्याची जोरदार चर्चा सध्या होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणताही अधिकृत उमेदवार वडगाव शहरात जाहीर करण्यात आलेला नाही. ना की अन्य कोणत्या पक्षाचा उमेदवार जाहीर झाला आहे. दरम्यान 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. त्यापूर्वीच भाजपाकडून मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांचेही नाव समोर आल्याने आता वडगावकरांची लेक वडगाव शहराच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर
– अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

