Dainik Maval News : वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या सुर्या ढाब्याच्या इथे वडगाव पोलिसांनी गुरुवारी (दि.30) धडक कारवाई करीत टँकरमधून रॉकेल चोरी करणाऱ्यांना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी पोलिसांनी सुर्याच्या ढाब्याच्या इथे छापा टाकला. तेव्हा सुर्या ढाब्याच्या पार्किंगमध्ये टँकर (क्र MH 04 LQ 5518) मधून टँकर चालक उस्मान गुलाब फरास (वय 37) हा टँकरमधील रॉकेल चोरून ते पिकअप चालक सुरज मुकूंद केदारी (वय 26, रा. इंदोरी ता.मावळ) याच्या मदतीने पिकअप वाहन (क्र. MH 14 GU 6909) यातील बॅरेलमध्ये भरताना मिळून आला.
- पोलिसांनी याबाबत चालक उस्मान याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने, टँकरमधील पांढरे रॉकेल हे कान्हे येथील सुर्या ढाब्याचे मालक नारायण पुर्ण नाव माहित नाही याच्या मदतीने विक्री करीत असल्याचे सांगितले. पोलिसांनी टँकर चालक व पिकअप चालक यांनी चोरलेले 300 लीटर पांढरे रॉकेल (किंमत 15 हजार रुपये), 8 निळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे बॅरेल, रॉकेल काढण्याचा पाईप, टँकर व पीकअप वाहन असा मुद्देमाल जप्त केला आहे.
यासह गुन्ह्यातील रंगेहात ताब्यात घेतलेले आरोपी उस्मान गुलाब फरास (वय 37, रा. कर्जाळ ता. अक्कलकोट जि.सोलापूर) आणि सुरज मुकूंद केदारी (वय 26 वर्षे, रा. इंदोरी ता.मावळ जि.पुणे) यांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार डोईजड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अजित ननावरे, विशाल जांभळे, गणपत होले, उमाजी मुंडे, अधिकराव झेले, प्रशांत भोईर, किरण ढोले, गणेश होळकर, नेहा भोर यांनी केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City