Dainik Maval News : वडगाव शहराच्या वाढत्या नागरिकीकरणाचा वेग लक्षात घेऊन नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियाना’ अंतर्गत ३९ कोटी ३३ लक्ष रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा महत्त्वपूर्ण टप्पा शुक्रवारी (दि. २७ मार्च) पूर्ण झाला. आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘संस्कृती जलशुद्धीकरण केंद्र’ (WTP – 2 MLD) चे लोकार्पण उत्साहात पार पडले.
या योजनेअंतर्गत संपूर्ण शहरात तब्बल ८४ किमी लांबीचे पाईपलाईन जाळे उभारले जात असून, नूतनीकरण केलेल्या दोन जलशुद्धीकरण प्रकल्पांमधून दररोज सुमारे ४० लाख लिटर शुद्ध पाणी वडगावकरांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येला मोठा दिलासा मिळणार आहे.
डेक्कन हिल परिसरातील ३ लाख ८० हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम अंतिम टप्प्यात असून एप्रिल अखेरीस ती कार्यान्वित होणार आहे. तसेच उर्से खिंड आणि प्रभाग क्र. १७ मधील जलसाठा प्रकल्पांचे नियोजनही प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट २०२६ ची मुदत असतानाही ही योजना मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या प्रकल्पासाठी म्हाळसकर परिवाराने दिलेली जागा ही अत्यंत मोलाची ठरली असून, त्यांच्या योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी विशेष आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा अबोलीताई ढोरे, गणेश आप्पा ढोरे, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, मुख्याधिकारी प्रविण निकम तसेच सर्व नगरसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आमदार सुनील शेळके यांच्या विकासाभिमुख दृष्टीकोनामुळे वडगाव नगरपंचायत क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल घडत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. शहरातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवण्याच्या या उपक्रमामुळे वडगावच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
एकूणच, आमदार सुनील शेळके यांच्या प्रभावी नेतृत्वातून साकार झालेला हा पाणीपुरवठा प्रकल्प वडगावच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरत असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक
– तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय
– वृक्षमित्र म्हणून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत मावळमध्ये विशेष वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
– यंदाचा गुढीपाडवा ठरला ऐतिहासिक ! आई एकविरा देवीच्या मंदिराचा चोरीला गेलेला कळस तब्बल ८ वर्षांनी मिळाला