Dainik Maval News : मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मावळ-मुळशी विभागाचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी सोमवारी (दि.21) सायंकाळी वडगाव मावळ येथे पत्रकार परिषद घेतली. तहसीलदार कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला सुरेंद्र नवले यांसह तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान उपस्थित होते.
आज, मंगळवार पासून विधानसभा निवडणूक कार्यक्रमपत्रिकेनुसार उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होत आहे. त्यापार्श्वभूमीवर सोमवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी उमेदवारी अर्ज देणे, स्वीकारणे, प्रशासनाची तयारी याबद्दल महत्वाची माहिती दिली. मावळ विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याकरिता मंगळवार, दि. 22 ऑक्टोबर सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे.
उमेदवारासोबत फक्त चार जणांना कक्षात प्रवेश
मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. दिमांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात उमेदवार आणि त्यांच्या सोबत जास्तीत जास्त चार व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. याखेरीज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयापासून शंभर मीटर आवारात अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच या परिसरात उमेदवारांसोबत जास्तीत जास्त तीन वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.
पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार
उमेदवारी अर्ज मावळ तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात स्वीकारले जाणार आहेत. याकरिता आवश्यक संगणक, कर्मचारी, टेबल आदी व्यवस्था करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाबाहेर इच्छुक उमेदवारांसाठी प्राथमिक सुविधा उपलब्ध केली असून नामनिर्देशन पत्राची प्राथमिक पडताळणी केली जाईल. तसेच शंभर रुपयांचे स्टॅम्प बंद झाल्यामुळे यावेळी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाईल. विविध परवानगी बाबत एक खिडकी व्यवस्था सुरू केली असून विहित मुदतीत परवानगी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी मिळणार 6 दिवस
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिनांक 22 ते 29 ऑक्टोबर असा एकूण 8 दिवसांचा कालावधी असला तरीही प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी सहा दिवस मिळणार आहेत. शनिवार दिनांक 26 ऑक्टोबर आणि रविवार, दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच बहुतांश उमेदवार हे दिनांक 24 ऑक्टोबर नंतरच उमेदवारी अर्ज भरतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.
मतदार संघात आचारसंहिता भंगाच्या सहा तक्रारी दाखल
मावळ विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या सहा तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या निकालात काढून संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भाजपाची पहिली यादी जाहीर ! मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला ? सुनिल शेळकेंच्या उमेदवारीचा मार्ग जवळपास मोकळा
– राष्ट्रवादीच्या पहिल्याच यादीत सुनिल शेळकेंचे नाव असणार, ‘या’ 6 कारणांमुळे अजितदादा शेळकेंना दुसऱ्यांदा उमेदवारी देणार
– मोठी बातमी ! अजित पवारांकडून यादी जाहीर, आमदार सुनिल शेळके यांचे नाव गायब, चर्चांना उधाण, पाहा यादी…