Dainik Maval News : शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी आणि शाश्वत शेतीसाठी शेतीला पाणी, वीज आणि दळवळणाची साधने मुबलक प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे असते. त्यासाठी शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर कृषीपंपांची उपलब्धता करून दिली जात असून या सौर कृषी पंपांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा होत आहे.
समृद्धी महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग आणि गोवा मुंबई महामार्ग राज्याच्या विकासासाठी गोल्डन ट्रॅंगल ठरतील असे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद नियम 260 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना राज्यमंत्री बोर्डीकर बोलत होत्या.
- राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, राज्यात 2017 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली. अशा प्रकारची योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. येत्या काळात राज्यात सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेची क्षमता 16 हजार मेगावॅट करण्याचा उद्देश आहे. 2035 पर्यंत ही अपारंपरिक ऊर्जा निर्मिती 40 हजार मेगावॅट करण्यात येणार आहे.
सन 2024 – 25 मध्ये विक्रमी असे 2 लाख 73 हजार 266 कृषी पंप वाटप झालेले आहेत आणि एकूण 40 लाख कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवू शकत आहोत. मागेल त्याला सौर कृषी पंप व पी एम कुसुममधून दहा लाख कृषी ग्राहकांना सौर कृषी पंपाचं वाटप करण्यात येणार आहे. सौर कृषी पंपासाठी सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना फक्त 10% रक्कम भरावी लागते आणि अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ 5% रक्कम भरावी लागते. सौर ऊर्जेचा वार वाढल्यास येत्या काळात औद्योगिक वीजेचे दरही कमी होतील.
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग आणि गोवा – मुंबई महामार्ग हा गोल्डन ट्रँगल ठरेल. रस्त्यांचा विकास झाल्यामुळे शेतीमालाची वाहतुक सुलभ होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. मराठावाडा वॉटर ग्रीड हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील महत्वाकांक्षी प्रकल्प ही लवकरच साकारला जाईल, असेही राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News