Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत जड-अवजड वाहनांमुळे वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी मोठा निर्णय वाहतूक शाखेकडून घेण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबत आदेश जारी केला असून त्यानुसार आयुक्तालय हद्दीत अंतर्गत रस्ते, सेवा रस्ते ठिकाणी जड, अवजड वाहनांची वेगमर्यादा ही 30 किमी प्रति तास ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
काय आहे आदेश?
“2023, 2024 आणि 2025 या वर्षांमधील अपघातांचे अवलोकन केले असता जड-अवजड वाहनांच्या वेगामुळे वारंवार होणारे अपघात आणि त्यामुळे निर्माण होणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहनांचा वेग मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण व वाहतूक कोंडी कमी करणे आणि वाहतूक सुरळीत होण्याकरिता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील महामार्ग वगळून महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून तसेच अंतर्गत रस्त्यावरून जाणारे जड-अवजड वाहने जसे की डंपर, मिक्सर हायवा व इतर तत्सम जड अवजड वाहनाकरिता वेग मर्यादा जास्तीत जास्त 30 किमी प्रति तास करणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याकरिता महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या नोटिफिकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम 115, 116 (1) (ए) (बी), 116 (4) आणि 112 (2) अन्वये पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड यांनी यापूर्वीचे काही निर्बंध रद्द करून नवीन आदेश निर्गमित केले आहे.”
“त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताल अंतर्गत सर्व वाहतूक विभागांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या हद्दीतून जाणारे महामार्ग वगळून महामार्गाचे सेवा रस्त्यावरून तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहन, रुग्णवाहिका इ. खेरीज करून सर्व प्रकारच्या जड-अवजड (डंपर, मिक्सर, हायवा व इतर तत्सम जड अवजड) वाहनांकरिता जास्तीत जास्त 30 किलोमीटर प्रति तास वेग मर्यादा निश्चित करण्यात आली असून याबाबतची अधिसूचना अर्थात नोटिफिकेशन निर्गमित करण्यात आले आहे. या अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक 3 डिसेंबर पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे आदेश पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी जारी केले आहे.”

( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा निकाल
