मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागात पवना धरणाच्या बॅक वॉटर परिसरात मौजे शिळींब हे गाव आहे. शिळींब गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अवघा एकच शिक्षक मागील दोन महिन्यांपासून रुजू आहे. सर्व वर्ग सांभाळून शाळेची उर्वरित कामे करणे एकट्या शिक्षकाच्या अवाक्याबाहेर होतं. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी शिक्षकाने ही कैफियत ग्रामस्थांसमोर मांडली आणि ग्रामस्थांनी तसेच शालेय व्यवस्थापन समितीने याबाबत त्वरित मार्ग काढण्याचे ठरवले.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे उपतालुका अध्यक्ष शत्रुघ्न धनवे यांनी मागील दोन महिन्यांपासून शाळेत दुसरा एक शिक्षक उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न केले परंतू शिक्षण विभागाकडून पर्यायी शिक्षक उपलब्ध होत नव्हता. अखेर सोमवारी, दिनांक 21 ऑगस्ट रोजी ग्रामस्थांनी शाळेला थेट टाळे ठोकले आणि ही खबर गटविकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर पुढील काही तासांत सर्व चक्रे वेगाने फिरली.
ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकल्यानंतर अवघ्या काही तासात शिक्षण विभागाने या ठिकाणी पर्यायी दुसरा शिक्षक नेमून दिला. इतकेच नाही तर दुपारच्या आता नवीन शिक्षक शाळेत रुजू देखील झाला. नवीन शिक्षक येताच ग्रामस्थांनी आणि शिक्षक तसेच केंद्र प्रमुख यांच्या उपस्थितीत टाळा खोलून शाळा पुन्हा सुरु करण्यात आली.
ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेत गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी सोमवारी तातडीने सुत्रे फिरवत तात्पुरते एक शिक्षक शाळेवर पाठवले. महागाव येथील पदवीधर शिक्षक श्री पांडूरंग ढेंगडे हे शाळेवर दुपारी 12.30 वाजता रुजू झाले आणि नवीन शिक्षक रुजू होताच ग्रामस्थांनी शाळेला ठोकलेला टाळा काढला. शिळींब ग्रामस्थांच्या या हटके आंदोलनाची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.
“शिळींब शाळेतील शिक्षकाची 15 जून रोजी बदली झाली होती. त्यामुळे राहुल वाकचौरे हे एकच शिक्षक पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सांभाळत होते. यातून मुलांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे आणखीन एका नवीन शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे अनेकदा केली होती, पण त्याची पूर्तता होत नसल्याचे पाहून अखेर हे पाऊल उचलावे लागले.” – श्री शत्रुघ्न धनवे
ह्यावेळी ग्रामस्थांमध्ये शत्रुघ्न धनवे, वाघू दरेकर, सुरेश धनवे, चंद्रकांत धनवे, महेश बिडकर, सुरेश धनवे हे उपस्थित होत. तर केंद्रप्रमुख गोवित्री, मुख्याध्यापक राहुल वाकचौरे आणि नवीन रुजू झालेले शिक्षक पांडूरंग ढेंगडे उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मोरया प्रतिष्ठानकडून वडगावात पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धा, पहिलं बक्षीस 7 हजार रुपये, वाचा स्पर्धेचे नियम । Vadgaon Maval
– सुदवडी गावातील साई-सृष्टी नगरात अंतर्गत रस्त्याची दुर्दशा, स्थानिकांनी स्वखर्चाने केली तात्पुरती सुधारणा
– “सर्पदंश झाल्यावर दवाखान्यात जा, भक्ताकडे नाही”, कामशेत आणि तळेगावात सर्पांविषयी जनजागृती व्याख्यान