पुणे (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : आपला संसार सुरळीत चालावा आणि आपली मुलं शिकून मोठी व्हावीत, मुलांचं आपल्यापेक्षा चांगलं व्हावं.. या आणि याच इच्छेनं हरेक बाई आयुष्यभर झटते. मग, ही इच्छा पूर्ण करताना एखादीच्या वाट्याला येते अतिशय कष्टप्रद जीवन. पावलोपावली संघर्ष करावं लागणारं जीवन. हीचं प्रतिकूल परिस्थिती पुण्यातील मोरया पाणीपुरीच्या मालकीण रजनीताई कराळे (वय 46) यांच्याही वाट्याला आली होती. परंतु, सतत आणि सतत अपार कष्ट सोसून रजनीताईंनी परिस्थितीला बदलायला लावलं. शिक्षण फारसं झालेलं नसूनही आज त्या उत्कृष्ट व्यावसायिक झाल्या आहेत. अखंड मेहनतीनं आपल्या खाद्यपदार्थांच्या व्यवसायात नाव कमवले आहे. स्वबळावर त्यांनी घेतलेल्या भरारीची गोष्ट मोठी कौतुकास्पद आहे.
रजनीताईंचं माहेर संगमनेरचं. शिक्षण दहावीपर्यंत झालं व नंतर पाककलेचा कोर्स केला. लग्नाचं वय होताच त्यांचं लग्नही झालं. लग्नानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या. गेली जवळपास तीस वर्षे त्या नारायण पेठ परिसरात राहताहेत. तेव्हा पती रिक्षा चालवायचे व रिक्षाच्या व्यवसायावर काही भागायचं नाही. काही वर्षांनी पती पुणे महानगर परिवहन मंडळात नोकरीला लागले. पण सुरवातीला पगार फारच कमी होता. मग, रजनीताईंनीही संसार नीट पुढं नेण्यासाठी जेवणाचे डबे द्यायला सुरवात केली. मेसच्या व्यवसायाला छान प्रतिसाद मिळाला. पण त्यात सगळं त्या एकटयाच करायच्या. ताईंच्या बरयाच शस्त्रक्रिया झाल्या असल्यानं दगदग सहन होत न्हवती म्हणून त्यांनी मेसचा व्यवसाय थांबवला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
- काही ना काही करायचंच हे मनाशी घट्ट ठरवलं असल्यानं बचत गटाच्या माध्यमातून कागदी पिशव्यांच्या व्यवसायात पाऊल टाकलं. बचत गटाने रोटरी क्लबच्या माध्यमातून आयोजित केलेल्या प्रशिक्षणातून ताई कागदाच्या पिशव्या बनवायला शिकल्या व विक्रीबाबतचीही माहिती मिळाली. इतर महिलांना ताईंनी कागदी पिशव्या बनवायला शिकवले. जवळपास 300 महिलांना त्यांनी काम दिले होते. महिलांनी बनवलेल्या पिशव्यांतच्या विक्रीची जबाबदारी ताईंनी स्वतःवर घेतली होती. रिक्षाने महिलांच्या घरोघरी जाऊन त्या बनवलेला माल संकलीत करुन विकण्यासाठी न्यायच्या. विक्री कौशल्य उत्तमरित्या आत्मसात करुन ताईंनी मोठा ग्राहकवर्ग तयार केला होता. ताईंच्या विश्वासार्हतेचे व विक्री कौशल्याचे व्यावसायिकांमध्येही कौतुक व्हायचे. कागदी पिशव्यांच्या व्यवसायात रजनीताईंना मोठे यश मिळाले होते. यातच पुढं आणखी काही करण्याची संधी होती परंतु जास्त दगदग झेपत नसल्यामुळे ताईंनी हा व्यवसायही थांबवला.
संसार आणि मुलांसाठी रजनीताईंना स्वतः काहीतरी कमवायचं होतं. मग, घरबसल्या करता येईल असा खाद्यपदार्थांचा छोटासा व्यवसाय त्यांनी नारायण पेठ परिसरात सुरु केला. त्यांना स्वयंपाकाची, नवनवीन पदार्थ बनविण्याची आवड असल्याने या व्यवसायात ताई अगदी मनापासून उतरल्या. तुळशीबागेजवळच हातगाडी लावली. पाणीपुरी, शेवपुरी, रगडापुरी, मसाला पाव, कच्ची दाबेली हे पदार्थ विक्रीसाठी ठेवले आणि या ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अल्पावधीतच रजनीताईंची “मोरया पाणीपुरी” ग्राहकप्रिय झाली. पदार्थांची उत्तम चव, चांगला दर्जा आणि स्वच्छता व नीटनेटकेपणा असल्याने ग्राहक पुन्हा पुन्हा मोरया पाणीपुरीकडे येतात आणि आवर्जून ‘फारच छान’ अशी प्रतिक्रियाही देतात. रजनीताईही कितीही दमल्या असल्या तरी ग्राहकांशी हसतमुखानं संवाद साधतात. ( navratri special abhivadan navdurgana Dainik Maval )
आज ताईंनी मोठ्या कष्टाने आपला छोटासा व्यवसाय मोठा केलाय, मोरया पाणीपुरी लोकप्रिय झालीये. त्यांना स्वतःची ओळख निर्माण करुन दोन तरुणांना रोजगार दिला आहे, हे अभिमानाचे आहे. येऊ घातलेल्या चित्रपटातील एका प्रसंगाचे चित्रीकरण ताईंच्या दुकानात झाले आहे. कलाकारांनीही मोरया पाणीपुरीमध्ये विविध पदार्थांचा आस्वाद घेऊन ताईंचे कौतुक केले आहे. खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरु करताना ताईंना अडचणींचा सामना करावा लागला. रस्त्यावर गाडी उभी करताना काही लोक दादागिरी करायचे. तुमची तक्रार करु अशी भाषा वापरायचे. टारगट लोकही यायचे, खाऊन जाताना पैसे द्यायला त्रास द्यायचे, अशा अनेक प्रसंगांना ताई नेहमीच खंबीर बनून सामोरे गेल्या. जम बसवला. यजमानांचीही साथ मिळाली.
घरी पदार्थ बनवायचे, सकाळी एकटीनेच गाडी ढकलत आणायची, रात्री पुन्हा न्यायची. सकाळी बारा ते रात्री साडेदहा पर्यंत गाडीवर थांबायचं. सामान आणायलाही जायचं आणि घरची जबाबदारीही पार पाडयची, हे सगळं रजनीताईं जिद्दीनं, चिकाटीनं करत राहिल्या. मुलांना चागंलं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं… ताईंच्या मुलीने आज फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु केलाय, ती विवाहीत आहे आणि मुलगा छान नोकरी करतोय. आता त्या समाधानी आहेत. मुलांची शिक्षणं, मुलीचं लग्नं, स्वतःचं घर या सर्व इच्छा ताईंनी खाद्यपदार्थांच्या व्यवसायातून पूर्ण केल्या आहेत. आता ताईंना व्यवसायासाठी मोठी गाडी घ्यायची आहे. मोरया पाणीपुरीची-अजून तीनचार दुकानं सुरु करायची आणि आणखी मोठं घर घ्यायचं रजनीताईंचं स्वप्न आहे.
“महिलांनी प्रतिकूल परिस्थितीला कधीच घाबरुन जायचं नाही. जिद्द ठेवायची मग आपण काहीही करु शकतो. मीही फार कष्टानं मोठी झालेय. खाद्यपदार्थांच्या व्यवसायानं मला सर्वकाही दिलंय.” – रजनीताई कराळे
अधिक वाचा –
– भाविकांसाठी आनंदाची बातमी! कार्ला येथील आई एकविरा देवीचे दर्शन 24 तास सुरु राहणार
– आमदार सुनिल शेळके बनणार मंत्री? कार्यकर्त्यांकडून तालुक्यात बॅनरबाजी, वाचा काय आहे प्रकरण…
– धक्कादायक! लोणावळ्यात चिक्कीच्या दुकानात शिरला ट्रक