पुणे (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळ्या शहरांत-गावांमध्ये अनेक समारंभ- कार्यक्रम पार पडतात. कार्यक्रम पाहून-ऐकून, अनुभवून सारेजण तिथून बाहेर पडतात, घरी जातात. पण या समारंभातली एक गोष्ट तिथं उपस्थित राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात पुन्हा-पुन्हा रुंजी घालत राहते ती म्हणजे निवेदिका स्नेहल दामले यांनी केलेलं अतिशय सुंदर निवेदन आणि त्याचं प्रसन्न व्यक्तिमत्व. अफाट वाचन आणि अभ्यासानं निवेदन कौशल्यात नैपुण्य मिळवून स्नेहलताईंनी आपला मधुर स्वर आणि वाणीला घडवलं आहे. गेली 22 वर्षे ताई विविध कार्यक्रमांतून निवेदन करत आहेत. आज, मराठी भाषेत निवेदन करणारया महाराष्ट्रातील प्रसिद्ध निवेदिका म्हणून ताईंनी नावलौकिक मिळवला आहे. श्रोत्यांच्या मनावर त्यांच्या निवेदनाचा ठसा उमटला आहे. निवेदन या वेगळया प्रांतातील क्षेत्रातील ताईंचं काम तरुणींमध्ये महत्वाकांक्षा निर्माण करणारं आहे.
स्नेहलताई (वय 46) मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडच्या. त्याचं बारावीपर्यंतचं शिक्षण गावी झालं. पदवीच्या शिक्षणासाठी ताई पुण्यात आल्या. एस. एन. डी. टी. महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदवी (बी. ए.) मिळवली. नंतर रानडे इन्स्टिट्यूटमधून वृत्तपत्रविद्या पदविका पूर्ण केली व काही काळ दैनिक केसरीमध्ये उपसंपादक पदावर काम केले. शिक्षण घेत असताना स्नेहलताई महाविद्यालय-वसतिगृहात होणारया कार्यक्रमांचे निवेदन करायच्या, काव्यवाचनात, वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हायच्या. तेव्हा, मैत्रिणी ताईंना नेहमीच “तुझा आवाज किती गोड आहे गं, ऐकतच राहावसं वाटतं.” अशी प्रतिक्रिया द्यायच्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
- अभ्यास करुन ताई पुण्यात होणाऱ्या अनेक समारंभांना आवडीने जायच्या. कॉलेजातील कार्यक्रमात निवेदन केलं असल्यानं कदाचित या मोठ्या कार्यक्रमांचे निवेदन ऐकायला ताईंना फार आवडायचे. बारीक लक्ष देऊन त्या निवेदन ऐकायच्या. मग, आपल्यालाही निवेदन करायला जमेल, असं ताईंना वाटू लागलं. याच काळात प्रसिद्ध दिवंगत कवी सुधीर मोघे यांचं एका कार्यक्रमील निवेदन ऐकून स्नेहलताई प्रभावित झाल्या आणि भविष्यात निवेदिका बनण्यासाठी प्रेरणा व आत्मविश्वास ताईंना मिळाला.
सन 2000 मध्ये स्नेहलताईंचा विवाह झाला. विवाहानंतर त्या सातारा तेथे स्थायिक झाल्या. तिथल्या दैनिक ऐक्यमध्ये पुरवणीप्रमुख पदावर काम केले. ताईंचे यजमान छायाचित्रकार असल्याने ताईंनीही फोटोग्राफी शिकून घेतली. छायाचित्रकाराचेही काम केले. सासरी गेल्यावर स्नेहलताईंच्या निवेदन कौशल्याला पहिलं व्यासपीठ मिळालं ते सन 2001 मध्ये. त्यावर्षी सोसायटीच्या गणेशोत्सवनिमित्त झालेल्या कार्यक्रमाचे निवेदन ताईंनी केलं व या निवेदनाचं सर्वांनी फार कौतुक केलं. ( navratri special abhivadan navdurgana Dainik Maval )
पुढं, ताईंच्या सासऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबियांनी ‘स्नेहमंच’ ही संस्था सुरु केली. या संस्थेच्या उद्घाटन समारंभाचे निवेदन ताईंनी केले. इथेही, आलेल्या सर्व स्नेहीजनांनी ताईंच्या निवेदन कौशल्याला भरभरुन दाद दिली व त्यांच्याकडेही निवेदन करण्याबाबत विचारणाही केली. पुढं, हौसेने साताऱ्यातील अनेक कार्यक्रमांचं निवेदन ताईंनी केलं, एका कार्यक्रमात एका काकांनी छोटसं मानधनही दिलं, पैसे मिळाल्याचं ताईंना फार छान वाटलं आणि याचवेळी ताईंची निवेदिकेच्या कारकिर्दीची खरया अर्थाने सुरवात झाली.
ताईंचं निवेदन शैलीदार,ओघवतं, नेटकं आणि अचूक असं असल्यानं अनेक ठिकाणी त्यांना निवेदनासाठी बोलावणी येऊ लागली. चांगलं मानधनही मिळू लागलं आणि निवेदिकेची कारकीर्द आकार घेऊ लागली. पुढं, सन 2013 मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदच्या सातारयातील शाहूपुरी शाखेने विभागीय साहित्य संमेलन आयोजित केले होते. या संमेलनाच्या उद्घाटनापासून समारोपापर्यंतच्या निवेदनाची संपूर्ण जबाबदारी स्नेहलताईंना देण्यात आली आणि ती त्यांनी फार उत्तमरितीने पार पाडली. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या तेव्हाच्या अध्यक्षा ज्येष्ठ लेखिका माधवी वैद्य यांनी “या संमेलनानाने मला स्नेहल दामले ही सूत्रसंचालिका दिली.” असे गौरवोद्गार काढले होते, ही ताईंसाठी मोठ्या आनंदाची गोष्ट होती. विभागीय संमेलनामध्ये उत्कृष्ट निवेदन पाहून सासवड व घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन करण्यासाठी ताईंची निवड झाली. ही संधी म्हणजे ताईंना मिळालेला सन्मानच होता.
आपल्या पत्नीची ही सुंदर वाटचाल पाहून स्नेहलताईंच्या यजमानांनी त्यांना सातारा सोडून यापुढे करिअरसाठी पुण्यात स्थायिक होण्यासाठी सुचवले आणि सुरवातीला ताई एकट्याच पुण्यात आल्या, वर्षभर राहिल्या. पुण्यात कोणाशी जास्त ओळख नसल्यामुळे इथं कामं मिळवणं, रुजणं, रुळणं अवघड वाटलं होतं. पण ताईंनी सातत्यपूर्ण प्रयत्नांनी यश मिळवलं. वर्षभरात त्यांनी साताऱ्यापेक्षा अधिक कार्यक्रम पुण्यात केले होते. त्यामुळं आता पुण्यात व्यवस्थितपणे स्थायिक होऊ शकतो याची खात्री वाटली व सन 2016 पासून स्नेहलताई सहकुटुंब पुण्यात स्थायिक झाल्या आहेत. त्यांचे पती भरत हे संपदा सहकारी बॅंकेत जनसंपर्क अधिकारी आहेत आणि कन्या अकरावीत शिकतेय.
निवेदिका म्हणून घडताना आजपर्यंत ताईंना त्यांच्या सर्व कुटुंबियांचे प्रोत्साहन आणि सहकार्यही मिळत गेले. ‘आपली स्नेहल टिव्हीवरच्या निवेदकांपेक्षा चांगलं निवेदन करेल’ असा विश्वास सासूबाईंना वाटायचा. मुलगी आठ महिन्यांची असताना त्या निवेदनासाठी घराबाहेर पडल्या. तेव्हा कुटुंबियांनी मुलीला सांभाळले. यजमान तर नेहमीच सोबत आहेत आणि मुलगीही आईच्या वाचन-अभ्यासात, कामात व्यत्यय न आणता आपला अभ्यास-वाचन करत असते. त्यामुळं करिअरवर लक्ष केंद्रित करणं सोयीचं झालं आहे. ( navratri special abhivadan navdurgana Dainik Maval Life Story of Narrator Nivedika Snehal Damle )
- आजवरच्या वाटचालीत जवळपास 2000 कार्यक्रमांचे निवेदन करुन ताईंनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. सातारा, कराड, कोल्हापूर, धुळे, जळगाव, बेळगाव, नगर, नाशिक,औरंगाबाद, बेंगलोर, गोवा या ठिकाणी त्या निवेदनासाठी गेल्या आहेत. सातारयामध्ये झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आणि पुण्यात झालेली ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा या महत्वाच्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याचा बहुमान स्नेहलताईंना मिळाला आहे. सातारा नगरपरिषदेने त्यांना गौरविले आहे.
‘आवाज -व्हॉईस ओव्हर’ या वेगळया क्षेत्रातील, ‘निवेदन’ ही वेगळी वाट निवडून या वाटेवर स्नेहलताईंनी मोठ्या मेहनतीने आपल्या आवाजाचे-वाणीचे संस्मरणीय सूर उमटवले आहेत. प्रचंड वाचन, चिंतन, टिपणं काढणं, नोंदी ठेवणं, सतत माहिती संकलित करणं अशा सातत्यपूर्ण अभ्यासातून ताईंनी निवेदनाच्या कौशल्यात प्राविण्य मिळवलं आहे. स्नेहलताईंकडे येणारा प्रत्येक कार्यक्रम त्या आव्हान समजूनच पार पाडतात. समारंभ कोणताही असो…छोटा किंवा मोठा…ताईंच्या निवेदनाने तो समारंभ बहारदारच होतो, त्यांचा व्यासपीठावरील वावर समारंभात चैतन्य आणणारा असतो. याची अनुभूती असंख्य रसिकांना आलीये. स्नेहलताईंच्या आवाजानं नि वाणीनं श्रोत्यांच्या मनामनात घर केलंय.
“चागंली निवेदिका म्हणून रसिकांनी मला घडवले आहे. रसिकांचे भरपूर प्रेम मला मिळाले. माझ्याकडे आलेला प्रत्येक कार्यक्रम मी माझा म्हणून स्विकारते. प्रत्येकवेळी मी माझी रेषा वाढवण्याचा प्रयत्न करत राहिले. निवेदनाच्या क्षेत्रात काम करताना मी माझ्या कुटुंबातील नाती फार चांगल्या पद्धतीने सांभाळू शकले. व्यासपीठावर निवेदन करताना मनाविरुद्ध घडलेला प्रसंग आपण हसतमुखानं स्विकारुन पुढं जातो तसंच घरचे प्रसंग आणि प्रश्न मी हसतमुखानं स्विकारायला आणि शांतपणे सोडवायला शिकले, हाच खूप मोठा धडा मला माझ्या क्षेत्रात मिळाला आहे. सगळीकडे हसतमुखानं वावरण्याची ताकद मला निवेदनाच्या कामानं दिली आहे. आजवरप्रमाणे पुढेही असंच जीव ओतून, आपलेपणानं काम करत राहणार आहे. तरुण वर्गाचे निवेदनाच्या क्षेत्राकडे वळण्याचे प्रमाण फार कमी आहे, याची खंत वाटते. आवाजाच्या क्षेत्रात भरपूर संधी आहेत.” – स्नेहल दामले
अधिक वाचा –
– वडगाव शहर परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार; पीएमपी बस केंद्रात ऑनलाईन पास सेवेचा शुभारंभ
– मराठा समाजातील भावांनो टोकाचे पाऊल उचलू नका : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भावनिक आवाहन
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । खाद्यपदार्थांच्या व्यवसायाने आला आयुष्यात गोडवा; कष्टप्रद वाटेवरुन चालणाऱ्या रजनीताई कराळेंची संघर्षकहाणी