आगामी लोकसभा निवडणुकीत मावळमधून महायुतीकडून माझ्या उमेदवारी बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या झालेल्या बैठकीत निर्णय झाला आहे. त्यामुळे 2024 साली महायुतीचा उमेदवार मीच असून विजयी देखील मीच होणार हा माझा फाजील आत्मविश्वास नाही तर ठाम विश्वास असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. तसेच माझ्या कामाचा लेखाजोखा जनतेला देण्यासाठी बांधील आहे, वैयक्तिक कोणाला नाही, असेही ते म्हणाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांमध्ये माझी विजयाची मते ही निर्णायक असतील असा ठाम विश्वास व्यक्त खासदार बारणे म्हणाले, मी जनतेमध्ये राहून काम करणारा लोकप्रतिनिधी आहे. मागील 27 वर्ष मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. या काळात माझ्या डोक्यात किंवा अंगात कोणतीही हवा मी शिरू दिलेली नाही. जनतेची कामे करण्याला प्राधान्य देतो, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सतत पाठपुरावा करत असतो. कामामुळे मतदार माझ्यासोबत आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना मी काय काम केले हे मी जनतेला सांगेल, कोणीतरी राजकीय द्वेषातून व सुडापोटी मला काय काम केले असे विचारणा करत असेल तर त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही. माझी बांधिलकी माझ्या मतदारांशी आहे. ( Lok Sabha Election 2024 Announcement of Candidature for Maval Constituency by Shrirang Barne )
आमदार सुनील शेळके यांचे व माझे राजकीय किंवा वैयक्तिक कसलेच मतभेद नाही. पण त्यांनी माझ्यावर आरोप का केले, कोणी त्यांना बोलायला लावतंय का? हे बघावं लागेल, समक्ष भेटल्यावर मी त्यांना याबाबत विचारणा असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. तळेगावदाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी एन.के.पाटील यांच्याकरिता दिवंगत किशोर आवरे यांनी शिफारस केली होती म्हणून मी पत्र दिले. हे मी आमदार शेळके यांना देखील सांगितले होते व त्यांची बदली करा म्हणून शेळके यांनी माझ्याकडे मागणी केल्यानंतर मी मुख्यमंत्री यांच्या कानावर विषय घालत बदलीसाठी पत्र देखील दिले आहे. ते पत्र आमदार शेळके यांनी देखील पाठविले आहे. एखाद्या मृत व्यक्तीच्या विषयी मनात आकस ठेवणे योग्य नाही असे देखील बारणे म्हणाले. भाजपचे देशातील नेते अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला जे शिवसेनेचे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे. त्या जागा त्यांनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोण काय बोलते, याला महत्व नाही. भाजपाच्या या दोन नेत्यांशिवाय निर्णय घेणारा अजून कोणी आहे असे मला वाटत नाही. राष्ट्रवादीला त्यांची ताकद वाढली आहे असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल मागणी करावी, मागील काळात मी राष्ट्रवादीचा दोन लाख मतांनी पराभव केला आहे, याकडेही बारणे यांनी लक्ष वेधले.
मी विद्यमान खासदार आहे, आजमितीला माझ्यासमोर कोणीही इच्छुक नाही. मग, मी येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार आहे असे म्हटलो तर कोणाच्या पोटात कशाला दुखायला पाहिजे. मी नऊ वर्ष खासदार आहे, याकाळात माझा कोठेही ठेका नाही, मी व माझे कार्यकर्ते कोणाकडे जात नाही, मी कोणावर टीका टिपण्णी करत नाही, प्रामाणिकपणे नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करतो, कामाचा पाठपुरावा करतो, सरळ मार्गी चालतो, तरी केवळ राजकीय आकसापोटी माझ्यावर आरोप केले जात असतील त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल असे त्यांनी सांगितले. काही लोक निवडणुका आल्यात म्हणून वातावरण निर्माण करण्यासाठी राजकीय हेतूपोटी आरोप प्रत्यारोप करत आहेत. मी मोदी लाटेवर निवडून आलो हे आमदार शेळके सांगत आहेत. मग, त्यांचा किंवा अजित पवार यांचा नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर विश्वास नाही का? तुम्ही कोणत्या विचारांनी महायुतीत आलात याचेही उत्तर द्यावे. वातावरण निर्माण करून विरोधी पक्षाला फायदा होईल असे काही जणांच्या वक्तव्यावरून वाटते. त्यामुळे त्यांच्या हेतुविषयीही खासदार बारणे यांनी शंका व्यक्त केली.
अधिक वाचा –
– कैवल्यधाम योग संस्थेच्या शताब्दी सोहळ्याला राष्ट्रपतींची उपस्थिती; ‘योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग’ – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
– खासदार बारणेंनी घेतला लोणावळा शहरातील विविध विकासकामांचा आढावा
– जात वैधता प्रमाणपत्र काढायचंय? घरबसल्या करा ऑनलाईन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे