‘जल जीवन मिशन’ अंतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांवर देखरेखीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेख समिती नेमणार असल्याची घोषणा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत (दि. 15 डिसेंबर) केली. मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत होणारी कामे निकृष्ट दर्जाची असल्याची लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पाटील पुढे बोलताना म्हणाले की, ‘जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यात 34 हजार पाणीपुरवठा योजना पूर्ण करायच्या आहेत. या योजनांचे काम प्रगतीपथावर आहे. ज्या ठेकेदाराने काम संथगतीने केले आहे, त्यांना दंड ठोठावला जात आहे. या कामांच्या तटस्थ लेखापरीक्षणासाठी खासगी कंपनी नेमली आहे. तटस्थ लेखापरीक्षण आणि 25 टक्के काम झाल्याशिवाय ठेकेदाराला बिले अदा करायची नाहीत, असे निर्देश दिले आहेत. जलजीवन मिशनची कामे आणि त्यांचे तटस्थ लेखापरीक्षण व्यवस्थित होत आहे की नाही, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेख समिती नेमण्यात येत आहे,’ अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलबाराव पाटील यांनी दिली. ( committee will be appointed to monitor jal jeevan mission water supply schemes said minister gulabrao patil )
‘काही ठिकाणी योजना का थांबल्या त्याचा आढावा घेतला जात आहे. याशिवाय राज्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी विभागनिहाय बैठका घेतल्या जातील,’ असेही पाटील यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले. एका जिल्ह्यात सुमारे सातशे पाणीपुरवठा योजनेची कामे असतात. ठेकेदार कमी आहेत. बीड कॅपॅसिटी ज्यात आहे, त्यांनाच काम दिले जाते. मिस्त्री, मजूर मिळत नाहीत. म्हणून ही कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंता, ग्रामपंचायती आणि मजीप्राच्या कामाचा अनुभव असलेल्या निवृत्ताना काम दिले जात आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत आमदार अशोक चव्हाण, नितेश राणे, प्रशांत बंब यांनी सहभाग घेतला.
अधिक वाचा –
– ‘ईपीएस’ धारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी
– मावळ तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांच्या निकृष्ट कामांबाबत आमदार सुनिल शेळकेंची अधिवेशनात लक्षवेधी! पाहा व्हिडिओ
– आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी कार्ला गडावर अवघ्या 3 मिनिटात पोहोचता येणार; काय आहे गुडन्यूज? लगेच वाचा