छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन राज्य शासनामार्फत केले जात आहे. तसेच स्वराज्य निर्मितीसाठी प्राणपणाने लढलेल्या मावळ्यांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी, म्हणून ऐतिहासिक स्थळांचा, गावांचा विकास केला जात आहे. या अंतर्गत उमरठ येथील ‘नरवीर तानाजी मालुसरे’ यांच्या समाधीस्थळाचे सुशोभिकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 354 व्या पुण्यतिथीनिमित्त नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ व परिसर सुशोभिकरण कामाचा आरंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (ऑनलाईन), उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, ज्येष्ठ इतिहासकार आप्पासाहेब परब, स्थानिक समिती अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ( CM Eknath Shinde Announced 10 crores fund for Tanaji Malusare Mausoleum at Umrath )
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या समाधीस्थळाचे सुशोभिकरण होणार असून यामध्ये शिवकालीन जननी कुंभळाजाई मंदिराचे सुशोभिकरण, समाधी प्रवेशद्वाराजवळच्या कमानीचे बांधकाम, बुरुजाचे बांधकाम, प्रसाधनगृहे, अंतर्गत रस्ते काँक्रीट गटार, कंपाउंड वॉलचे बांधकाम ही कामे करण्यात येणार आहेत.
उमरठच्या ऐतिहासिक भूमीत नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या समवेत कोंढाणा किल्ल्यावरील लढाईत लढलेल्या शेलार मामा यांची समाधी आहे. या दोन्ही शूरवीरांना अभिवादन करुन मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरे यांनी दिलेली साथ आणि ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं’..ही घोषणा इतिहासात अजरामर आहे. स्वामीनिष्ठेचा जगापुढे ठेवलेला आदर्श हा इतिहास कधीही विसरू शकणार नाही. राज्य शासनामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 32 शिवकालीन गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीसाठी 50 कोटी देखील मंजूर केले आहेत. या सर्व कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अधिक वाचा –
– हुश्श..! पुण्यात प्रशासनाला ‘कात्रजचा घाट’ दाखवून पळालेल्या बिबट्याला पकडण्यात यश, रात्री सव्वा नऊ वाजता मोहिम फत्ते । Pune Katraj Park Leopard Update
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते किवळे-विकासनगर भागातील 10 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन । MP Shrirang Barne
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात! ट्रक आणि ट्रेलर यांच्या धडकेत 2 जण जागीच ठार । Accident On Mumbai Pune Expressway