पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत आमदार सुनिल शेळके आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात वाद झाल्याने बैठक चांगलीच वादळी ठरली. दरम्यान बैठक संपल्यावर आमदार सुनिल शेळके यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. इतर तालुक्यांना देखील निधी मिळावा. मात्र मावळला निधी मिळत असताना आपण त्यामध्ये खोडा घालू नये, अशी माझी विनंती आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला खासदार शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार चेतन तुपे, आमदार सुनिल शेळके, सुनिल कांबळे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. ( Pune District Planning Committee Meeting MLA Sunil Shelke and Supriya Sule dispute )
बारामती आणि शिरूर लोकसभा क्षेत्रात विकासकामे करण्यासाठी निधी दिला जात नाही. मात्र दुसर्या बाजूला मावळसाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला असल्याची भुमिका सुप्रिया सुळे यांनी बैठकीमध्ये मांडली. त्यावर, ताई आमच्या मतदारसंघाचा उल्लेख सारखा का करता. ज्यावेळी बारामती करिता मोठ्या प्रमाणावर निधी मिळत होता, त्यावेळी आम्ही कधी बारामती बारामती म्हटले का? असा सवाल करत सुनिल शेळके यांनी टोकले. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि सुनिल शेळके यांच्यातील वाढता वाद लक्षात घेत निधी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करू आणि नक्की निधी दिला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले. त्यानंतर हा वाद थांबला.
संपूर्ण बैठकीत सुप्रियाताईंनी फक्त मावळ तालुक्याचा चार पाच वेळा उल्लेख केला आणि मावळला मिळणाऱ्या निधीवर आक्षेप घेतला. त्यामुळे मी त्यांना सतत मावळचे नाव का घेता, आम्ही कधी बारामती किंवा इतर तालुक्याला मिळणाऱ्या निधीबद्दल बोललो का? असे म्हटले. नंतर अजितदादांनी मुद्द्याला पुर्णविराम दिला. त्यामुळे हा विषय तिथेच संपला. परंतु, मावळ तालुक्याला मागील २५ वर्षांत काहीच मिळाले नाही. आता जेव्हा काही मिळत आहे. तालुक्याचा विकास होत आहे, विकासकामे मार्गी लागत आहेत, तेव्हाच आक्षेप का घेतला जात आहे. मावळला निधी मिळत असताना कुणीही खोडा घालू नये, इतकंच आमचं म्हणणं आहे, असे आमदार सुनिल शेळके म्हणाले.