Dainik Maval News : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे एसटी आगारातून स्वच्छतेची शपथ घेऊन ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक वैभव निंबाळकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड आणि कर विभाग प्रमुख कल्याणी लाडे यांसह सीआरपीएफचे 400 जवान, नगरपरिषदेचे 150 हून कर्मचारी, डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता पंधरावडा’ साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून तळेगाव दाभाडे नगरपरिषद, सीआरपीएफ तळेगाव दाभाडे आणि तळेगाव दाभाडे रोटरी क्लब यांच्या सहयोगाने ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमादरम्यान बोलताना रुपाली चाकणकर यांनी स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले. तर ममता राठोड यांनी स्वच्छतेसंबंधी जागरूकता वाढविणारी कविता सादर केली. यावेळी तळेगाव दाभाडे एसटी आगार, सरसेनापती उमाबाई दाभाडे उद्यान आदी ठिकाणे स्वच्छ केली गेली.
तळेगावात स्वच्छता दिन साजरा –
दरवर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर हा स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून बुधवारी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, फ्रेंड्स ग्रुप शिक्षक मित्र परिवार, नवक्षितिज मतिमंद संस्था आंबी यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात, स्टेशन चौक ते जिजामाता चौक हा रहदारीचा रस्ता दुतर्फा प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त करण्यात आला. यात जवळपास 25 ते 30 बॅगा भरून कचरा नगरपालिका कर्मचारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन तळेगाव वाहतूक विभागाचे चंद्रकांत गावडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी क्लबचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, विद्यमान अध्यक्ष मिलिंद शेलार, सहदेव डोंबे, सुहास धस, सुनील रहाटे आदी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ५ शिक्षकांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान । Maval News
– कामशेत खिंडीत झालेल्या भीषण ट्रेलर अपघातात एकाचा जागीच होरपळून मृत्यू – पाहा Video
– ग्रामीण भागातील विद्यार्थीनींची पायपीट थांबणार ! पवना विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप