Dainik Maval News : जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकन मिळालेल्या पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्याला सोमवारी (दि.30) युनेस्कोच्या पथकाने भेट देऊन गडावरील विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती घेतली. स्थानिक अधिकारी व ग्रामस्थांशीही दुभाषाच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांपैकी १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील किल्ल्यांना नामांकन देण्यात आले आहे. यामध्ये शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खांदेरी, प्रतापगड आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. जागतिक वारसा यादीमध्ये स्थळांचा समावेश केल्याने देशाला गौरव प्राप्त होतो.आणि ही स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात. यामुळे या स्थळांच्या परिसरात आर्थिक विकासाला तसेच पर्यटनाला चालना मिळते.
मावळ तालुक्यातील लोहगड हा त्यापैकी एक महत्वाचा किल्ला. युनेस्कोच्या पथकाने सोमवारी लोहगड किल्ल्याला भेट दिली. युनेस्कोच्या टिम चे प्रमुख हाँजाँग.ली,केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी गजानन मांडवरे, राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वाहने, वन विभागाचे अधिकारी, प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, मंडल अधिकारी,सचिन कोकाटे,सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात,शरद गाडे आदी उपस्थित होते. या पथकाने सुमारे साडे तीन तास गडाची पाहणी केली. त्यांनी गडावरील गणेश दरवाजा, महा दरवाजा, चोर दरवाजा, हनुमान दरवाजा, महादेव मंदिर, कबर, तटबंदी, त्रिंबक तलाव, सदर, शिवकालीन स्थळांचे अवशेष, लेण्या, घोड्यांचा तबेला, गडावरील सोळा कोनी पाण्याच्या तलाव, विंचू काटा सह गडावरील इतर व्ह्यू पॉइंट आदींना भेट देऊन पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्येक ठिकाणाची माहिती व इतिहास जाणून घेतला व काही सूचनाही केल्या.
स्थानिकांशी साधला संवाद
लोहगडावरील पाहणीनंतर त्यांनी किल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका हाँटेल मध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था व ग्रामस्थांशी दुभाषाच्या माध्यमातून संवाद साधला. गडावरील हवामान, पर्जन्यमान, वनस्पती आदी बाबींची त्यांनी माहिती घेतली. युनेस्को पथकाच्या भेटीच्या अनुषंगाने काही गावांत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहितीही ग्रामस्थांनी दिली.यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या अलका धानिवले,माजी चेअरमन गणेश धानिवले,सरपंच सोनाली बैकर,उपसरपंच पंढरीनाथ विखार,ज्योती धानिवले,पोलीस पाटील सचिन भोरडे,सदस्य स्वाती मरगळे,स्नेहल बैकर, काजल ढाकोळ,अभिषेक बैकर,महेश शेळके,सचिन टेकवडे, यांच्या सह ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महाराष्ट्रात 3 ऑक्टोबर हा दिवस ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा होणार ; शिंदे सरकारचा निर्णय
– कॅबिनेट बैठकीत पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामास मान्यता, एकूण 42 हजार 711 कोटींचा प्रकल्प । Pune Ring Road
– रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तळेगावात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाची सुरूवात । Talegaon Dabhade