Dainik Maval News : प्रतिनिधी – संध्या नांगरे : वडील व्यसनी असल्यामुळं तिचं बालपण चुरगळलं गेलं. लग्नानंतर पतीही कमालीचा व्यसनी निघाला. घरात भाडणं-मारहाण रोचजीच झाली. छळामुळं ती लेकरांना घेऊन रस्त्यावर राहिली. असल्या विचित्र परिस्थितीत या मातेनं मोलमजुरी करुन मुलांचं पोट भरलं, त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. दोन मुलांचं लग्न केलं. पुढं, तिला स्वच्छ संस्थेत कचरा वाहकाची नोकरी मिळाली आणि आता समाधानचे दिवस पाहायला मिळालेत. या वेदनामय आणि अतिशय कष्टप्रद जीवनप्रवासाच्या काटेरी वाटेवर खंबीरपणे चालत राहिलेली आपली आजची दुर्गा आहे, कचरा वाहक रेखा बोरगे (वय ४८). स्वतःच्या वाट्याला आलेल्या वाईट परिस्थितीशी एकटीनं झुंज देत आता ही लढाई रेखामावशी जिंकल्या आहेत.
रेखामावशी पिंपरीत स्थायिक आहेत. त्यांचे पती राजेंद्र हयात नाहीत. मावशींच्या पाच मुलांपैकी एक मुलगी मृत्युमुखी पडली असून एक मुलगा-मुलगी विवाहीत व एक मुलगा-मुलगी लग्नाचे आहेत. रेखामावशींचं बालपण मुंबईला गेलं. आई-वडील, चार भावंडं असं त्यांचं कुटुंब. आई मोलमजुरीची करायची पण वडील प्रचंड व्यसनी होते. त्यामुळं पोट भरण्यासाठी मुलंही काम करायची. व्यसनाधीनतेमुळं वडील काहीही काम करायचे नाहीत. पत्नी-मुलांकडं सतत पैसे मागायचे. पैसे दिले नाहीत तर घरात सर्वांना मारायचे. याच वातावरणात रेखामावशींचं बालपण सरलं आणि वयाच्या १४ व्या वर्षीच लग्न झालं.
पिंपरी हे मावशींचं सासर. सासरी गेल्यावर तरी सुखा-समाधानाचे दिवस बघायला मिळतील असं मावशींना वाटलं होतं. पण, माहेरापेक्षा सासरची परिस्थिती बिकट निघाली. सासरचं राहतं घर म्हणजे झोपडी होती. पती कमालीचा व्यसनी होता. लग्नानंतर सहा महिन्यातच पतीचा फीट येण्याचा आजार मावशींसमोर आला. पती थिएटरमध्ये कामाला जातो असं लग्नाआधी मावशींना सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात तो कामाला जातच नसल्याचं लक्षात आलं. अशा परिस्थितीतही पाच मुलांना मावशींनी जन्म दिला. मुलांकडं पाहूनही नवरा सुधारला नाही. सासू-सासरेही काही करु शकले नाही. नवरा सगळं आयतं मागून मावशींनाच कमवून आणायला भाग पाडायचा. कमवून आणलेले पैसे मावशींनी दिले नाही तर त्यांना मोठी दुखापत होईपर्यंत मारहाण करायचा, घरातून बाहेर काढायचा.
- दिवसेंदिवस, घरात ‘खायचं काय ?’ हा प्रश्न ‘आ’ वासून उभा ठाकला होता. खायचा प्रश्न इतका तीव्र झाला की मावशींच्या एका मुलीनं खाण्यासाठी आत्महत्या केली. लेकरांची भूक भागवण्यासाठी मावशी धडाधड धुण्याभांड्याची कामं करत होत्या, भंगार वेचून पैसे कमवत होत्या. ‘विसावा’ हा शब्द मावशींच्या जीवनातून हरवल्यासारखं झालं होतं. भांडणं-हाणामारी हा मावशींच्या घरातील नित्यक्रम बनला. त्यामुळं मुलं वडीलांपाशी राहायला घाबरायची.
हाणामारी झाली की रडत-रडत मुंबईला माहेरी जायचं आणि संसाराच्या ओढीनं परत सासरी यायचं, हे खेटे सतत सुरु होते. यात मुलांची प्रचंड हेळसांड झाली. सासरी थेरगावला स्वतःचं घर होतं, मध्येच बोरगे कुटुंब तिथं राहायला गेलं. तिथंही पतीचा छळ कमी होईना. साधारण सन २००२-०३ च्या दरम्यान पतीनं मावशींनी भयानक मारहाण केली आणि त्यांना मुलांसह तडक माहेर गाठावं लागलं, पण माहेरीही आधार मिळाला नाही. मग, मावशी मुलांना घेऊन दादरला अक्षरश: पदपथावर राहू लागल्या.
तब्बल सात-आठ वर्ष फुटपाथवर राहून मोलमजुरी करत मुलांना सांभाळत होत्या. याच दरम्यान मुंबईत एका दानशूर काकांनी मावशींच्या दोन मुलींना निवासी शाळेत प्रवेश मिळवून दिला आणि किमान दोघींच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला, त्या नववीपर्यंत शिकल्या. तीन मुलं ताईंसोबत राहीली, त्यांनाही शिक्षण देण्याचा मावशींनी प्रयत्न केला. पतीच्या त्रासातून सुटका करण्यासाठी मावशी विधवा महिलांच्या आश्रमातही राहिल्या. काहीदिवस कल्याणला कोंबड्या सांभाळण्याचं कामही केलं.
मुंबईत दिवस कसेबसे ढकलत असतानाच पिंपरीत महापालिकेकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना घरे मिळत असल्याचे मावशींना समजल्यावर त्वरीत त्या पिंपरीला परत आल्या. पुन्हा मजुरीची कामं करु लागल्या. अजूनही पतीचा छळही थांबेना. अखेर सन २००८-०९ मध्ये मावशींना पिंपरीत स्वतःचं हक्काचं घर मिळालं आणि ही मायलेकरं आनंदाश्रूंनी घरात विसावली. तेव्हा मुलं १३-१४ वर्षांची झाली होती. रेखामावशींची कसरत सुरुच राहीली. त्या फिरुन भंगार वेचून घर चालवू लागल्या. हेही दिवस सरत असतानाच सन २०१०-११ मध्ये शहारात कार्यरत असलेल्या स्वच्छ संस्थेमार्फत मावशींना कचरा गाडीवर नोकरी मिळाली आणि दिलासा मिळून मावशींनी इतक्या वर्षांनी मोकळा श्वास घेतला. परंतु, पतीचा सन २०१३ मध्ये मृत्यू झाला. सुखाचा संसार स्वप्नवत राहीला.
पतीच्या निधनानंतर नोकरीच्या आधारावर मावशींनी एका मुलीचा व एका मुलाचा विवाह उरकून दिला. धाकट्या दोन मुलांनाही योग्य मार्ग दाखवत राहिल्या. गेली १३-१४ वर्ष मावशी स्वच्छ संस्थेत कचरा गाडीवर ‘कचरा वाहक’ म्हणून कार्यरत आहेत. सध्या रहाटणी परिसरात त्यांची नेमणूक आहे. आयुष्यभर अवहेलना आणि टोकाचे कष्ट काढलेल्या या मातेचे श्रम अजूनही त्याच उमेदीनं सुरू आहेत. त्यांची दोन मुलं नोकरीसाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्याही विवाहाची जबाबदारी मावशींना पार पाडायची आहे.
सध्या सकाळी सहा ते अडीचपर्यंत त्या काम करतात. कामात हजेरी देण्यासाठी सकाळी रिक्षा किंवा रेल्वेनं त्या आकुर्डीला जातात. कामातही त्या शिस्तबद्ध आणि चोख आहेत, नागरिकांशी नेहमी हसतमुखानं संवाद साधतात. पावसात-भर उन्हात कचरा गाडीत उतरलेल्या रेखामावशी पाहताना त्यांच्या आयुष्याच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची इच्छा होते. रेखामावशींचा हा वेदनादायी जीवनपट जाणून घेताना मन हेलावून जातेच आणि अन्याय-अत्याचाराविरुद्ध पेटून उठण्याची शक्ती आपोआपच संचारते. अशा या लढवय्या दुर्गेला ‘दैनिक मावळ’चा सलाम आहे.
रेखामावशी म्हणतात, “नवऱ्याची वाईट परिस्थिती पाहून मी कोणावरही अवलंबून राहिले नाही. स्वतः कष्ट करुन मुलांना मोठं केलं, घर चालवतेय. आता माझं चांगल चाललंय. ‘स्वच्छ’ संस्थेचं काम मी यापुढेही करत राहणार आहे. पण माझ्या मुलांना कचऱ्याचे काम करु देणार नाही.”
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अभिवादन नवदुर्गा : ‘दैनिक मावळ’च्या नवदुर्गा – 2023
1. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘मुलींच्या शिक्षणासाठी ती झालीये सरस्वती अन् लक्ष्मी’, गोष्ट वनिता सावंत यांच्या ध्येयाची…
2. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । प्रबोधन गीतांच्या सादरीकरणातून त्या करताहेत लोकजागर; नकुसाबाई लोखंडेंचा प्रेरणादायी जीवनप्रवास
3. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘आईच्या मायेने वंचित लेकरांना ती घडवतेय…’ समाजसेविका गौरी सोनवणे यांची प्रेरणादायी वाटचाल
4. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । कुटुंबाचा विरोध झुगारून ती बनली बस कंडक्टर; वाचा ‘डॅशिंग लेडी कंडक्टर’ रेश्मा सय्यद यांचा जीवनप्रवास
5. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचताना बहरलीये ‘फुलराणी’, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा थक्क करणारा प्रवास
6. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । तिच्याच ‘लेखणीनं’ सोडवली तिची चौकटीतील घुसमट; कवयित्री कल्पना दुधाळ यांचा वाखण्याजोगा लेखनप्रवास
7. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । शिल्पकाराने घडवले लेकीच्या जीवनाचे शिल्प; शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांची कलाप्रांतातील जडणघडण
8. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । खाद्यपदार्थांच्या व्यवसायाने आला आयुष्यात गोडवा; कष्टप्रद वाटेवरुन चालणाऱ्या रजनीताई कराळेंची संघर्षकहाणी
9. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रसिकमनावर बिंबलाय तिच्या स्वरातील अन् वाणीतील गोडवा; प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामलेंची भरारी