Dainik Maval News : प्रतिनिधी – संध्या नांगरे : लहानपणापासूच तिला आई-वडिलांचे सुंदर संस्कार लाभले. या संस्कारांनी तिची जीवनवाट सुपीक झाली. या वाटेवर तिनं ध्येयाची पेरणी केली. कष्टाचं खतपाणी घातलं आणि मग काय ? यशाची हिरवीगार हिरवळ तिच्या जीवनात सदैव फुलत राहिली. ती बनली ‘शास्त्रीय नृत्यांगना’. हा समृध्द जीवन प्रवास आहे ख्यातनाम आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ शास्त्रीय (भरतनाट्यम) नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर यांचा. शास्त्रीय नृत्याला ताईंनी दिलेलं योगदान महत्वपूर्ण आहे. त्यांचं कर्तृत्व ‘संस्कार, ध्येय आणि मेहनत’ या तीन गोष्टीचं व्यक्तीच्या जीवनातील महत्व सांगून जातं.
स्वातीताई मूळच्या मुंबईच्या आहेत. त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईलाच झालं. आई-वडील आणि तीन बहिणी असं पंचकोनी त्यांचं कुटुंब. ताईंचे वडील पद्माकर कुलकर्णी चित्रपट सृष्टीत प्रोडक्शन मॅनेजर म्हणून कार्यरत होते. आई रजनी संगीत नाटकांमध्ये कामं करायची. त्यामुळं घरात कलेचं वातावरण होतंच. बोरीवलीच्या सुविद्यालय मराठी शाळेत ताईंचं शालेय शिक्षण झालं. लहानपणी रेडीओवर संगीत लागलं की छोटीशी स्वाती तिच्या मनानंच तालात नाच करायची. कौतुकानं आपल्या चिमुकलीचं हे सुंदर नृत्य त्यावेळीही वडिलांनी कॅमेऱ्यात साठवून ठेवलं आहे आणि लेकीच्या अंगी असलेले कलागुण ओळखून वडिलांनी ताईंसाठी घरीच शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण सुरु केलं आणि लहानपणीच गुरु सत्यनारायण यांच्याकडं ताई भरतनाट्यम शिकू लागल्या. ते ताईंचे पहिले नृत्यगुरु.
‘नृत्य’ स्वातीताईंना फार आवडू लागलं. शालेय जीवनात आंतरशालेय नृत्य स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पारितोषिकं मिळवली. इयत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत दरवर्षी शाळेच्या विविध कार्यक्रमांत ताईंचं नृत्य सादर व्हायचंच. शाळेच्या वयातील स्वातीताईंच्या नृत्यातील यशानं त्यांची भविष्यात शास्त्रीय नृत्यक्षेत्रातच वाटचाल करण्याची दिशा स्पष्ट झाली होती. नृत्यासाठी विविध भाषा शिकायच्या असल्यानं इयत्ता अकरावीला ताईंनी कला शाखेला प्रवेश घेतला. दहावी आणि बारावीलाही ताई गुणवत्ता यादीत झळकल्या होत्या.
सन १९८५ ला स्वातीताई English Literature विषयातून पदवीधर झाल्या. पदवीनंतर सन १९८९ मध्ये ताईंनी नालंदा नृत्य-कला, महाविद्यालयातून ‘बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स’ ही पदवी मिळवली. तिथं पद्मभूषण डॉ. कनक रेळे, पी. व्ही. सौंदराजन या गुरुंच्या मार्गदर्शनानं त्या घडल्या. ‘नृत्य’ हे ध्येय असल्यानं स्वातीताईंनी जीव ओतून रात्रंदिवस अभ्यास केला. सलग सहा तास नृत्याचा सराव केला आणि या पदवीची चारही वर्ष ताईंनी सर्व विषयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. मानाचा सर नागेश्वर पुरस्कार मिळाला. अख्ख्या मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवून ताई विद्यापीठाच्या सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या. नालंदा विद्यापीठात असताना नृत्याचे अनेक व्यावसायिक कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली आणि ताईंच्या शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील कारकिर्दीचा यशस्वी प्रारंभ झाला.
- स्वातीताईंचे वडील चित्रपट सृष्टीत कार्यरत असल्यानं आणि ताईंना ही नृत्यकला अवगत असल्यानं लहानपणी चित्रपटात व नाटकात अभिनयाची संधीही मिळाली होती. पण, शास्त्रीय नृत्यातच रस असल्यानं ताई चित्रपटात काम करायला नको म्हणाल्या. मोठेपणीही दूरदर्शन व आकाशवाणीवर काम केलं. त्यांचे कथाकथनाचे, स्वरचित कवितांचे कार्यक्रम झाले पण नृत्य हेच ध्येय असल्यानं ताईंनी नृत्याला वाहून घेतलं.
आई-वडिलांनीही आपल्या मुलींना हवं ते करण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यांच्यात अभ्यासू वृत्ती निर्माण केली. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी अखंड मेहनत करायला शिकवलं. “तुला वाटतं ते शिकून घे, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत” ही ताईंच्याआई-वडिलांची भूमिका होती. मुलींच्या लग्नासाठीही त्यांनी कधीही घाई केली नाही. म्हणूनच तिघी बहिणी उत्तमरित्या घडल्या व विवाध प्रांतात मुक्तपणे संचार करुन त्यांना उंच झेप घेतली. ताई नृत्यांगना, मधली बहीण स्त्री रोगतज्ज्ञ आणि धाकटी बहिण ख्यातनाम आहार मार्गदर्शक तज्ज्ञ आहे आणि तिघीनीही आज आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे.
पदवीनंतर, सुप्रसिद्ध संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर यांच्याशी ताईंचा विवाह झाला. विवाहानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या. संगीत क्षेत्रातीलच पती मिळाल्यानं ताईंची नृत्य कारकीर्द अधिक बहरु लागली. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून ताईंनी नृत्य अलंकार व संगीताचार्य या पदवी पूर्ण केल्या. नुपूर आणि निनाद या आपल्या दोन्ही मुलांना संगीत क्षेत्रात घडवलं. नुपूर लोकप्रिय शास्त्रीय नृत्यांगना आहे आणि निनाद बाबांसारखा नावाजलेला संतूरवादक आहे. पुण्यात ताईंनी ‘नुपूरनाद’ या शास्त्रीय नृत्यसंस्थेची स्थापना केली आहे. आपल्या संस्थेत ताईंनी अनेक कसलेल्या नृत्यांगना घडवल्या आहेत व घडवत आहेत.
देशविदेशात स्वातीताईंचे नृत्याचे कार्यक्रम झाले आहेत व होत आहेत.
‘संगीताचार्य’ पदवीसाठी ‘नृत्ययोगा’ या विषयात ताईंनी संशोधन केलं आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात ताईंच्या या प्रबंधावर आधारित चार वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. ताईंना भारत सरकारकडून संशोधन शिष्यवृत्ती मिळाली आहे. स्वातीताईंच्या नृत्यप्रकल्पांना पती डॉ. दैठणकर यांनी संगीत दिलं आहे. यात पती-पत्नीनं परस्परांना प्रोत्साहन देत संगीत क्षेत्रात देदीप्यमान कारकीर्द घडवली आहे.
आजवर स्वातीताईंनी साकारलेले नृत्यप्रकल्प वैविध्यपूर्ण आणि समाजाला संदेश देणारे आहेत. मराठी संत रचनांनावर आधारित – ‘राजस सुकुमार’, संत सूरदासांच्या रचनांवर आधारित- ‘सूर श्यामरंग’, आदि शंकराचार्यांच्या रचनांवर आधारित -‘शिवोहम’, महाकवी कालिदासांच्या रचनेवर आधारित – ‘ऋतुसंहार’, ‘पद्मिनी ‘, स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आधारित – ‘तेजोनिधी’, संत नामदेव महाराजांच्या रचनांवर आधारित ‘नृत्यबानी’, ‘नुपूरनाद’, ‘पंचकन्या’ आणि ‘दान केली कौमुदी’, ‘नृत्ययोग’ हे नृत्यप्रकल्प ताईंनी पूर्ण केले असून देशात-परदेशात त्यांचे प्रयोग सुरु आहेत. ताई आणि शिष्या हे सादर करतात. नृत्य हाच स्वातीताईंचा ध्यास आणि श्वासही आहे.
स्वातीताई म्हणतात, “माझे आई-वडील माझ्यासाठी दीपस्तंभ आहेत. त्यांनी मला घडवलं. मी काही मिळण्यासाठी कधी काही केलं नाही, तर आवड म्हणून मनापासून केलं. म्हणून मी यशस्वी झाले. नृत्यातील अध्यात्मिकता मला अधिक भावली. नृत्य आपल्याला देवाच्या जवळ जाण्याची संधी देते. नृत्यातून मी परमेश्वराची आराधनाच करत असते. नृत्याच्या माध्यमातून देव आणि देशाची सेवा करत राहणार आहे. नृत्य म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करणं. म्हणून आपण कोणत्याही वयात नृत्य शिकू शकतो आणि करु शकतो. महिलांनी आपल्या आवडीच्या गोष्टी करुन, छंद जोपासून स्वतःचे आरोग्य सांभाळावे. तेव्हाच आपण कुटुंबासाठी आणि समाजासाठी सक्षमतेनं उभं राहू.”
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अभिवादन नवदुर्गा : ‘दैनिक मावळ’च्या नवदुर्गा – 2023
1. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘मुलींच्या शिक्षणासाठी ती झालीये सरस्वती अन् लक्ष्मी’, गोष्ट वनिता सावंत यांच्या ध्येयाची…
2. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । प्रबोधन गीतांच्या सादरीकरणातून त्या करताहेत लोकजागर; नकुसाबाई लोखंडेंचा प्रेरणादायी जीवनप्रवास
3. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘आईच्या मायेने वंचित लेकरांना ती घडवतेय…’ समाजसेविका गौरी सोनवणे यांची प्रेरणादायी वाटचाल
4. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । कुटुंबाचा विरोध झुगारून ती बनली बस कंडक्टर; वाचा ‘डॅशिंग लेडी कंडक्टर’ रेश्मा सय्यद यांचा जीवनप्रवास
5. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचताना बहरलीये ‘फुलराणी’, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा थक्क करणारा प्रवास
6. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । तिच्याच ‘लेखणीनं’ सोडवली तिची चौकटीतील घुसमट; कवयित्री कल्पना दुधाळ यांचा वाखण्याजोगा लेखनप्रवास
7. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । शिल्पकाराने घडवले लेकीच्या जीवनाचे शिल्प; शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांची कलाप्रांतातील जडणघडण
8. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । खाद्यपदार्थांच्या व्यवसायाने आला आयुष्यात गोडवा; कष्टप्रद वाटेवरुन चालणाऱ्या रजनीताई कराळेंची संघर्षकहाणी
9. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रसिकमनावर बिंबलाय तिच्या स्वरातील अन् वाणीतील गोडवा; प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामलेंची भरारी