Dainik Maval News : प्रतिनिधी – संध्या नांगरे : प्रेमविवाह करुन ती संसाराला लागली. या नवविवाहितेचा संसार सुखाचा सुरु होता. ती आई झाली… इवलीशी सुंदर परी त्यांच्या आयुष्यात आली. आनंदाला भरतं आलं होतं. परंतु, अवघ्या सहा महिन्यातच या आईच्या आनंदाला ओहोटी लागली. कारण, तिच्या बाळाला अचानक अर्धांगवायूचा झटका आला, सोनुली लुळी पडली. सर्व उपचार केले. तेव्हा सोनुली चालू शकली पण ती कधीच ऐकू आणि बोलू शकणार नाही हे समजलं. ही आई पुरती गळून गेली. तिची पावलं जीवन संपवण्यापर्यंत गेली. अशातच एका पुस्तकानं तिला सावरलं आणि नवा दृष्टिकोन दिला. आपल्या कर्णबधिर मुलीची उत्तम आई होण्याचं आव्हानं तिनं स्विकारलं आणि पेललं. मुलीला शिक्षण देऊन शास्त्रीय नृत्यांगना बनवलं आणि आता तिला छोट्याशा व्यवसायाद्वारे स्वतःच्या पायावर उभं केलंय. आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी आयुष्यभर मिनिटा-मिनिटाला झटत राहिलेली दुर्गा म्हणजे डॉ. उज्ज्वला सहाणे (वय ६५).
उज्ज्वलाताई मूळच्या संगमनेरच्या. त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण संगमनेरलाच झालं. पदवी पूर्ण होताच सन १९८१ मध्ये उज्ज्वलाताईंचा वर्गमित्राशीच प्रेमविवाह झाला. संसाराची सुरुवात झाली. ताईंचे पती केशव शिक्षक होते. त्यावेळी ते चाकणच्या शाळेत कार्यरत होते. हे नवविवाहित दांपत्य चाकणला स्थायिक होतं. पतीप्रमाणं उज्ज्वलाताईंनीही ‘बॅचलर ऑफ एज्युकेशन (बी.एड.) ची पदवी पुण्यात पूर्ण केली. वाचनाची गोडी असल्यानं ग्रंथपालासाठीची पदविकाही पूर्ण केली आणि पती कार्यरत असलेल्या शाळेतच शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. नोकरी-घर असा दोघांचं आयुष्य चांगलं हसतखेळत चाललं होतं.
सन १९८५ मध्ये उज्ज्वलाताई आई झाल्या. त्यांना मुलगी झाली. इवल्या पावलांच्या आगमनानं संसार समृद्ध झाला होता. इवल्याशा परीनं घर व्यापून टाकलं होतं. दिवस आनंदात चालले होते आणि सहा महिन्याची असताना परीला अचानक अर्धांगवायूचा तीव्र झटका आला. तिचे हातपाय वाकडे झाले. तातडीनं डॉक्टराकडं धाव घेतली. त्वरित उपचार केले पण आता बाळ चालू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मग विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारांनी ही काही महिन्यांतच चालू लागली. हायसं वाटलं. आपलं लेकरु आता बरं झालंय अन् तिच्या तोंडून ‘आई’ ‘बाबा’ शब्द ऐकण्यासाठी ही आई आतुरतेनं वाट पाहात होती. आपल्या परीचं नाव ठेवलं होतं ‘प्रियांका’. अडीच वर्ष होत आली तरी प्रियंका बोलेना म्हणून पुन्हा डॉक्टरांकडं धाव घेतली तेव्हा ही गोड परी कधीही ऐकू आणि बोलू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. अर्धांगवायूच्या झटक्यात तिची श्रवणशक्ती पूर्णतः संपून गेली होती.
आपल्या लेकरावर हे काय बेतलं? म्हणून उज्ज्वलाताई गलबलून गेल्या. हतबल झाल्या. पुढची जीवनवाटही त्यांना धूसर दिसू लागली आणि लेकीला उराशी कवटाळून पती-पत्नीनं अखेर जीवन संपवायचा निर्णय घेतला होता. इतक्यात उज्ज्वलाताईंची डॉक्टर असलेली बहिण त्यांना भेटायला आली. आपल्या बहिणीची मनस्थिती पार विस्कटली असून हे नवरा-बायको काहीतरी वेगळंच म्हणजे आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत हे तिच्या लक्षात आलं. या डॉक्टर बहिणीनं उज्ज्वलाताईंना मोठा धीर दिला, खचून जाऊ नका सांगितलं, मार्गदर्शन केलं आणि हेलन केलर याचं ‘स्टोरी ऑफ माय लाईफ’ पुस्तक वाचायला दिलं. पुस्तक वाचल्यानंतर उज्ज्वलाताई धक्क्यातून थोड्या सावरल्या. ऊसनं अवसान आणून डोळे पुसुन त्या लेकीसाठी उभारल्या आणि पतीलाही धीर दिला. आपण आपल्या प्रियंकाला छान मोठं करु-घडवू असा निश्चय या आई-वडिलांनी केला. पुस्तकातून मिळालेल्या प्रेरणेनं प्रियांकाचं नाव आता ‘प्रेरणा’ ठेवलं. यावेळी प्रेरणा साडेतीन वर्षाची झाली होती आणि तिच्या आईचा एक नवा जीवनप्रवास सुरु झाला होता.
आव्हानात्मक असलेल्या या नव्या जीवनप्रवासात मूकबधिर व्यक्तींसाठी असलेल्या प्रशिक्षणाची माहिती मिळवली आणि स्वतः ते प्रशिक्षण पूर्ण केलं. पुण्यात इयत्ता पहिलीमध्ये प्रेरणाला शाळेत प्रवेश घेतला. प्रेरणाच्या शाळेसाठी बदली करुन घेऊन पती-पत्नी दोघेही पिंपरी-चिंचवडमधील शाळेत आले व सांगवीला स्थायिक झाले. आई-बाबा नोकरीला जायचे आणि प्रेरणाला शाळेत जायला शाळेच्या बसची सुविधा घेतली. घरी आल्यावर आई-बाबा दोघेही प्रेरणाचा अभ्यास घ्यायचे. हळूहळू प्रेरणा शाळेत रमली. चित्रकला, खेळ, नाच अशा वेगवेगळ्या गोष्टीत ती आवडीनं सहभागी व्हायची. माझी प्रेरणा चागंला नाच करते हे उज्ज्वलाताईंच्या लक्षात आलं आणि साधना नृत्यालयाच्या गुरु शुमिता महाजन यांची भेट घवून प्रेरणाला नृत्य शिकवण्याची विनंती केली. शुमिताताईंनीही उत्स्फूर्तपणे हे आव्हान स्विकारलं व वयाच्या सातव्या वर्षीच प्रेरणाची नृत्य शिकायला सुरवात झाली.
सन २००७ मध्ये तिचं अरंगेत्रम् पूर्ण झालं. उज्ज्वलाताईंनी मूकबधिरांसाठीचं प्रशिक्षण स्वतः घेतल्यामुळं त्या प्रेरणाशी बारीकसारिक संवाद साधू शकल्या, तिला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून देऊ शकल्या. पुढं ताईंनी प्रेरणाला ओठांच्या हलचाली करुन बोलण्याचं प्रशिक्षण दिलं. ती नृत्य विशारद पदवीपर्यंत पोचली असून महाविद्यालयीन शिक्षणही घेत आहे.
आपल्या विशेष मुलीला घडवताना उज्ज्वलाताईंनी घराकडं, स्वतःच्या नोकरीकडं, प्रगतीकडं तितकंच व्यवस्थित लक्ष दिलं. डॉ. अनिल अवचट यांच्या साहित्यावर संशोधन करुन पीएचडी पदवी मिळवली. ताईंना वाचनाची आणि अभ्यासाची फार आवड आहे. प्रेरणाला घडवायचं असेल तर उत्तम प्रकृतीसाठी स्वतःकडे नीट लक्ष दिलं पाहिजे-स्वतःच्या जपल्या पाहिजेत, हे उज्ज्वलाताई विसरल्या नाहीत.
गुरु सांगतील त्या पद्धतीनं प्रेरणाला नृत्य कार्यक्रमांसाठी तयार करण्याची जबाबदारी उज्ज्वलाताई सुरुवाती पासून आत्तापर्यंत जराही न थकता पार पाडत आहेत. प्रेरणाच्या जीवनावर त्यांनी ‘द साउंड ऑफ सायलेन्स’ हे पुस्तक लिहिलं असून त्याला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. पुण्यात मूकबधिरांसाठीच्या वधू-वर मंडळात उज्ज्वलाताई सक्रीय आहेत. त्याद्वारेच काही वर्षांपूर्वी ताईंनी थाटामाटात प्रेरणाचा विवाह करु दिला.
तिच्या बाळंतपणाची मोठी जबाबदारी अतिशय सुंदरपणे पार पाडली. त्यांचा नातू आता शाळेत जातो आहे. नातवाला सांभाळण्याबरोबर त्याला घडवण्यातही त्या मुलगी आणि जावयाला साथ देत आहेत. जावई स्वप्नील यांची नोकरी गेल्यामुळं उज्ज्वलाताईंनी दोघांना प्रेरणा कलेक्शन नावानं कपड्यांचा व्यवसाय सुरु करुन दिला आहे. या प्रेरणाचे नृत्याचे कार्यक्रम आणि कपड्यांच्या व्यवसायाच्या आधारावर प्रेरणा व स्वप्नील स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत.
उज्ज्वलाताई त्यांना सर्वतोपरी मदत करत आहेत. प्रेरणा नृत्य प्रशिक्षणवर्गही घेत आहे. आता उज्ज्वलाताई सेवानिवृत्त झाल्या आहेत आणि पूर्णवेळ प्रेरणाचा संसार फुलवण्यासाठी झटत आहेत आणि मूकबधिर पालकांना मार्गदर्शनाचं महत्वाचं काम करत आहेत. त्यासाठी प्रेरणा कम्युनिकेशन ट्रस्टची स्थापना केली असून भविष्यात ट्रस्टचं काम प्रेरणानं मोठं करावं अशी त्यांची इच्छा आहे. अचानक मूकबधिर झालेल्या स्वतःच्या लेकीवरचं संकट मोठ्या मेहनतीनं दूर करुन तिला घडवणाऱ्या या दुर्गेला ‘दैनिक मावळ’कडून मानाचा मुजरा आहे.
उज्ज्वलाताई म्हणतात, “प्रेरणानं आम्हाला वेगळं जग दाखवलं. तिला मी एकटीनं घडवणं अवघड होतं पण तिचे बाबा सतत माझ्यासोबत राहिले. गुरु शुमिता महाजन आणि आम्ही दोघांनी तिच्यावर फार कष्ट घेतले. दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना मदत केली पाहिजे. ती खरी गरज आहे.”
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अभिवादन नवदुर्गा : ‘दैनिक मावळ’च्या नवदुर्गा – 2023
1. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘मुलींच्या शिक्षणासाठी ती झालीये सरस्वती अन् लक्ष्मी’, गोष्ट वनिता सावंत यांच्या ध्येयाची…
2. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । प्रबोधन गीतांच्या सादरीकरणातून त्या करताहेत लोकजागर; नकुसाबाई लोखंडेंचा प्रेरणादायी जीवनप्रवास
3. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘आईच्या मायेने वंचित लेकरांना ती घडवतेय…’ समाजसेविका गौरी सोनवणे यांची प्रेरणादायी वाटचाल
4. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । कुटुंबाचा विरोध झुगारून ती बनली बस कंडक्टर; वाचा ‘डॅशिंग लेडी कंडक्टर’ रेश्मा सय्यद यांचा जीवनप्रवास
5. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचताना बहरलीये ‘फुलराणी’, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा थक्क करणारा प्रवास
6. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । तिच्याच ‘लेखणीनं’ सोडवली तिची चौकटीतील घुसमट; कवयित्री कल्पना दुधाळ यांचा वाखण्याजोगा लेखनप्रवास
7. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । शिल्पकाराने घडवले लेकीच्या जीवनाचे शिल्प; शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांची कलाप्रांतातील जडणघडण
8. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । खाद्यपदार्थांच्या व्यवसायाने आला आयुष्यात गोडवा; कष्टप्रद वाटेवरुन चालणाऱ्या रजनीताई कराळेंची संघर्षकहाणी
9. ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रसिकमनावर बिंबलाय तिच्या स्वरातील अन् वाणीतील गोडवा; प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामलेंची भरारी