Dainik Maval News : मावळ विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आज, बुधवार (दि. 23 ऑक्टोबर) सकाळपासूनच एकाहून एक मोठ्या घडामोडी घडत आहेत. सर्वांत आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मावळ विधानसभेची उमेदवारी विद्यमान आमदार सुनील शेळके यांनाच जाहीर केली. त्यापाठोपाठ पक्षातील अन्य इच्छुक पदाधिकारी बापूसाहेब भेगडे यांनी पक्षाने तिकीट डावलल्याने थेट पक्षाच्या पदाचा राजीनामा जाहीर केला. त्यानंतर आता बापूसाहेब भेगडे यांनी आणखीन एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. बापूसाहेब भेगडे यांनी आपण मावळ विधानसभा निवडणूक लढविणार असून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
बुधवारी (दि.23) सुनिल शेळके यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर बापूसाहेब भेगडे हे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण मावळवासियांचे लक्ष लागले होते. त्यानुसार बापू भेगडे यांनीही तातडीची पत्रकार परिषद बोलवली. या पत्रकार परिषदेत आधी त्यांनी घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. त्यापाठोपाठ उमेदवारी डावलल्यानंतर पदाचा प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगत राजीनामे जाहीर केले. यावेळी त्यांच्या समर्थकांनीही राजीनामे दिल्याचे माहिती समोर येत आहे.
राजीनाम्यासोबत आपण विधानसभा निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे सांगत बापू भेगडे यांनी मावळ विधानसभा निवडणूक लढणार आणि अपक्ष म्हणून निवडणूकीला सामोरे जात असल्याचेही जाहीर केले. आता बापू भेगडे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्यापाठीमागे नेमके काय राजकारण आहे, हेही पुढच्या काही दिवसात किंवा तासात समजेल. परंतु आमदार सुनिल शेळके यांना आता त्यांच्याच पक्षातील नाराजवंत आणि अनुभवी नेत्याचा सामना करावा लागणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.